नाशिक | प्रतिनिधी | Nashik
प्रशांत महासागरातील समुद्री पाण्याचे तापमान व तेथील हवेचा दाब व मान्सून आगमनासंबंधीच्या इतर पाच वातावरणीय घडामोडी पाहता मान्सून (Monsoon) देशाच्या दक्षिण टोकावर म्हणजे केरळात त्याच्या सरासरी तारखेच्या चार दिवस अगोदर म्हणजे २७ मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान (IMD) खात्याने वर्तवला आहे.
मागील वर्षी ३० मे रोजी अपेक्षित असताना तो ३१ मे रोजी केरळात (Kerla) दाखल झाला होता व प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सूनची अरबी समुद्रीय शाखाच १० ते ११ जूनला महाराष्ट्रात पोहोचली होती. परंतु मान्सूनी प्रवाहात ताकद नव्हती. यावर्षी २७ मे या तारखेत कमी अधिक चार दिवस विचारात घेतले तर मान्सून ह्या वर्षी केरळात २३ ते ३१ मे दरम्यान कधीही दाखल होऊ शकतो.
मुंबईत १० जूनला व सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या (Maharashtra) अंतर्गत भागात १५ जूनला मान्सून अपेक्षित असला तरी अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टी समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात बळकटपणा किती आहे, हे पाहूनच महाराष्ट्रात मान्सून जूनच्या कोणत्या तारखेला प्रवेश करेल, हे सांगता येईल. त्याअगोदर पूर्वमोसमी अवकाळी पावसाच्या सरीची अपेक्षा आहे.
दरम्यान, हवामान विभागाने यंदा १०५ टक्के पावसाचा (Rain) अंदाज दिला आहे. यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतभर चांगल्या पावसाचे संकेत आहेत. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना (Farmer) फायदा होईल आणि त्यांची पिके चांगली होण्याची आशा आहे.
पुढील १५ दिवस म्हणजे २५ मेपर्यंत पूर्वमोसमी गडगडाटी अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे दिवसाचे कमाल तापमान त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता आहे. दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही. त्यामुळे यावर्षीचा मे महिना आल्हाददायक जाईल.
– माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ