Saturday, September 21, 2024
Homeनगरमान्सूनची नगर जिल्ह्यापर्यंत धडक

मान्सूनची नगर जिल्ह्यापर्यंत धडक

दक्षिणेत ‘मुसळधार’, उत्तरेत दमदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

तळकोकण ओलांडून मान्सूनची वाटचाल पुढे वेगाने सुरू आहे. त्यानंतर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ही शहरं काबीज करुन नगर जिल्ह्यातही सर्वदूर मान्सून धडकल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आता शेती कामांना वेग येणार आहे. या पावसानेे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिंळाला आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात लागोपाठ दुसर्‍या दिवशीच्या रात्री मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेष करून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यासह नगर, शेवगाव, संगमनेर तालुक्यातील काही मंडळात दोन दिवसांपासून वादळी वार्‍यासह पाऊस बरसत आहे. रविवारी दिवसभर आणि शनिवारी पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील पाण्याचे टँकर बंद होण्याची शक्यता आहे. नगर शहरात दुपारी चारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली असून रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता.

दरम्यान, शनिवारी दक्षिणेतील कर्जतमधील भांबोरा मंडळात सर्वाधिक 82.5 मि.मी. राशिन 74.8 मि.मी आणि श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव मंडळात 71 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. यासह नगर तालुक्यातील जवळपास सर्व मंडळात 21 ते 37 मि.मी. पावसाची नोंद झालेली असून शेवगाव, संगमनेर, अकोले तालुक्यातील मंडळात दमदार पाऊस झालेला आहे. हा पाऊस खरीप हंगामाच्या पेरण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काल रविवारी उत्तर नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता तालुक्यात काल रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता.

श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या विविध भागात काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात कोसळत होता. नेवासा तालुक्यातील भेंडा जवळील सौंदाळा येथे विजेच्या खांबावर वीज कोसळल्याने दोन गावे अंधारात बुडाली. देवगाव वीज उपकेंद्राकडे जाणार्‍या वीज वाहक तारांच्या खांबावर वीज पडल्याने मोठा आवाज झाला. देवगाव फिडरची तार तुटून शेजारील रांजणगाव फिडरच्या वीज वाहिनीवर पडल्याने देवगाव व रांजणगाव या दोन्ही गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता.

जिल्ह्यात 7 व 8 जूनला मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. असह्य उष्णतेने अस्वस्थ झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे खरीपच्या पेरण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली असून कपाशी लागवडीसाठी शेत तयार करण्यात शेतकरी व्यस्त दिसत आहे. दक्षिण जिल्ह्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र अधिक असून झालेल्या पावसामुळे कडधान्य पिकांच्या पेरणीला सुरूवात होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांना सुरूवात न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात अनेक महसूल मंडळात मोठ्या पावसाची प्रतिक्षा असल्याने पुढील काही दिवसात पाऊस झाल्यानंतर सर्वदूर पेरण्यांना सुरूवात होणार आहे.

रविवारी नगरसह दक्षिणेत पाऊस
रविवारी दुपारनंतर नगर शहरासह जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी वादळीवार्‍यासह ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरूवात झाली होती. रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता. पुढील काही दिवस हा पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. नगर शहरात रविवारी रात्री उशीरापर्यंत हा पाऊस सुरू होता.

भंडारदरा पाणलोटात आनंदाच्या मान्सून सरी

3 दलघफू पाणी नव्याने दाखल || आज आणखी आवक वाढणार

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात मान्सूनचे आगमन झाले असून काल पहाटे झालेल्या सलामीच्याच पावसामुळे धरणात 3 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. दरम्यान, रविवारी रात्री पाणलोटात पावसाने जोर धरल्याने आज सोमवारी धरणात नव्याने पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडादरा धरणातील पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे मान्सून पाणलोटात कधी दाखल होतो याकडे शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा लागून होत्या. अखेर मान्सून पाणलोटात दाखल झाला असून काल पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस कोसळला. त्यामुळे धरणात नव्याने पाणी दाखल झाले. आतापर्यंत एकूण नव्याने 12 दलघफू पाणी जमा झाले आहे. काल या धरणातील पाणीसाठ 1057 दलघफू होता. पाणलोटात काल दिवसभर पावसाळी वातावरण टिकून होते.

रात्री साडेनऊ वाजता पाणलोटात पावसास सुरूवात झाली. त्यानंतर 15 मिनीटांत जोरदार पाऊस सुरू झाला होता.
भंडारदरा पाणलोटात पाऊस कधी आणि किती पडतो यावरच पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे नियोजन करीत असतात. अन्य वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

मुळा पाणलोटातही हजेरी
कोतूळ (वार्ताहर)- नगर जिल्ह्यातील शेती आणि उद्योगल व्यवसायाला चालना देणार्‍या मुळा धरण पाणलोटातही मान्सूनचे आगमन झाले आहे. आंबित, पैठण,हरिश्चंद्र गड येथे अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात केवळ 6136 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. लवकर पाऊस आला नसता तर नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची स्थिती अत्यंत बिकट बनली असती. पण यंदा गत वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने चिंतेत पडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या