नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारासंदर्भात डील झाली आहे. या डीलला आता मदर ऑफ ऑल डील म्हटले जात आहे. या संदर्भातील चर्चा २००७ मध्ये सुरु झाली होती. आज या संदर्भात भारत-EU शिखर परिषदेत याची अधिकृत घोषणा केली.
सचिव राजेश अग्रवाल काय म्हणाले?
सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटले की कराराचा मसुदा आणि त्याचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यात ५ ते ६ महिने लागणार आहेत. यानंतर दोन्ही पक्ष या करारावर अधिकृत हस्ताक्षर करतील. सरकारच्या अंदाजानुसार हा मुक्त व्यापार करार पुढील वर्षी लागू होईल. या करारामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढेल. याचा मुख्य उद्देश द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करत दोन्ही अर्थव्यवस्थांना जोडणे हा आहे.
हा करार भारत आणि युरोपियन युनियनमधील सुमारे २ अब्ज लोकांच्या बाजारपेठेसाठी द्वार उघडणार आहे. राजेश अग्रवाल यांच्या मते, हा करार भारतासाठी ‘संतुलित आणि भविष्योन्मुखी’ आहे. यामुळे केवळ व्यापारच नाही, तर युरोपियन गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात भारतात येईल.
मुक्त व्यापार करारामुळं दोन्ही बाजू ९० टक्क्यांहून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क रद्द करण्यावर सहमत झाल्या. याशिवाय टेलीकॉम, वाहतूक, अकाऊंटिंग आणि ऑडिटिंग सारख्या क्षेत्रात व्यापार अधिक सुलभ बनवण्याची तरतूद आहे.
सध्या भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आणि लेबर इन्सेटिव्ह सेक्टरवर १० टक्के आयात शुल्क युरोपियन युनियन आकारते. साधारणपणे हे शुल्क 3.8 टक्के होते. भारत युरोपियन युनियनच्या वस्तूंच्या आयातीवर 9.3 टक्के शुल्क आकारतं. यात सर्वाधिक शुल्क 35.5 टक्के ऑटोमोबाइल्स आणि इतर पार्टसवर आकारलं जातं. प्लॅस्टिकवर 10.4 टक्के आणि रसायनांवर 9.9 टक्के आयात शुल्क आहे.
मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडिया एनर्जी वीकच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. त्यांनी नमूद केले की १२५ देशांचे प्रतिनिधी गोव्यात चर्चेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की इंडिया एनर्जी वीक अल्पावधीतच संवाद आणि कृतीसाठी जागतिक व्यासपीठ म्हणून उदयास आला आहे. भारत हा ऊर्जा क्षेत्रात प्रचंड संधींचा देश आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढत आहे, म्हणजेच ऊर्जेशी संबंधित उत्पादनांची मागणी सतत वाढत आहे. भारत जागतिक मागणी पूर्ण करण्यास आणि संधी प्रदान करण्यास सक्षम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एनर्जी वीकमध्ये सांगितले की, भारत ऊर्जा क्षेत्रातील प्रचंड संधींचे केंद्र बनले आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारत-EU मुक्त व्यापार कराराला “मदर ऑफ ऑल डील” असे संबोधन करून ते म्हणाले की, यामुळे व्यापार, गुंतवणूक, उत्पादन आणि रोजगारासाठी मोठ्या संधी निर्माण होतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची भूमिका मजबूत होईल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




