कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)
दिवाळीच्या उत्साहात सारा परिसर उजळून निघाला असताना कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. फटाक्यांच्या आवाजातच बिबट्याने अंगणात खेळणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुकल्यावर झडप घातली, मात्र आईच्या अतुलनीय धाडसामुळे या निरागस बाळाचे प्राण वाचले. ही घटना केवळ थरारकच नव्हे, तर मातृप्रेमाची (ममतेची) जिवंत कहाणी ठरली आहे.
शिंगणापूर येथील रहिवासी दिव्यांश पवार (वय ५) हा सायंकाळी अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याला जबड्यात पकडले. दिव्यांशची किंकाळी ऐकताच त्याची आई मंदाबाई पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. मंदाबाई यांनी वाघिणीप्रमाणे धैर्य दाखवत, बिबट्याची शेपूट पकडून त्याला जीवाच्या आकांताने ओढायला सुरुवात केली. त्यांच्या या अविश्वसनीय धाडसाने बिबट्या घाबरला आणि त्याने दिव्यांशला सोडून पळ काढला. आईच्या या धाडसापुढे बिबट्याला अखेर हार मानावी लागली.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दिव्यांशला तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी नगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या संकटकाळात 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, ‘संजीवनी युवा प्रतिष्ठान’ या स्थानिक संस्थेच्या मदतीने चिमुकल्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले. उपसरपंच श्याम संवत्सरकर, माजी सरपंच कैलास संवत्सरकर, दत्ता संवत्सरकर आणि ग्रामसेवक अविनाश पगारे यांनी पुढाकार घेत या गरीब कुटुंबाला तत्काळ मदत केली.
गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. जनावरे, पाळीव प्राणी आणि आता लहान मुलेही असुरक्षित झाली आहेत. यापूर्वी कोल्हे वस्ती आणि टाकळी फाटा परिसरातही अशाच घटना घडल्या आहेत. बिबट्यांकडून पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाच्या सततच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. कोपरगाव येथे तीन तालुक्यांचे मुख्य वनविभाग कार्यालय असूनही गेल्या वर्षभरापासून येथे पूर्णवेळ अधिकारी नाही. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
वनविभागाच्या गलथान कारभारावर नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करणे गरजेचे आहे, पण अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे कोपरगाव वनविभाग कार्यालयाला पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच, 108 रुग्णवाहिका प्रशासनाने आपली सेवा अधिक सक्षम करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
मंदाबाई पवार यांनी दाखवलेले धैर्य हे जगातील प्रत्येक भीषण शक्तीवर मात करणाऱ्या मातृप्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी आपल्या लेकराचे प्राण वाचवून केवळ एका मुलाची आई नसून त्या धैर्याचे आणि ममतेचे मूर्तिमंत उदाहरण बनल्या आहेत. त्यांच्या या धाडसाला गावकऱ्यांनी आणि संपूर्ण तालुक्याने सलाम केला आहे.




