Monday, November 25, 2024
Homeब्लॉगकरोनाची ‘कम्युनिटी स्प्रेड’कडे वाटचाल

करोनाची ‘कम्युनिटी स्प्रेड’कडे वाटचाल

करोनाची आता ‘कम्युनिटी स्प्रेड’ कडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्हयात आता एक एक दोन दोन रुग्ण न आढळता 20, 25, 50 असे रुग्ण एकेका दिवसात आढळू लागले आहेत. आपण सार्‍यांनी वेळीच काळजी न घेतल्यास घराघरात कोरोनाचा शिरकाव व्हायला वेळ लागणार नाही. मात्र तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असेल. म्हणूनच म्हणतो, नंदुरबारकरांनो… सावधान! अजूनही वेळ गेलेली नाही, स्वतःसह इतरांची काळजी घ्या, ‘घरीच रहा आणि सुरक्षित रहा’.

राकेश कलाल, नंदुरबार

जानेवारी महिन्यात भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मार्चपर्यंत रुग्णांची संख्या हजारावर होती. तोपयर्र्ंत नंदुरबार जिल्हयात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नव्हता. परंतू दि.17 एप्रिल 2020 रोजी नंदुरबारात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दि.8 मे पर्यंतच्या 22 दिवसांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 21 पर्यंत पोहचली होती यात नंदुरबार शहर व तालुक्यातील 8, शहादा शहरातील 9, अक्कलकुवा येथील 4 रुग्णांचा समावेश होता. या 22 दिवसांमध्ये आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण पाहता जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच जाईल, अशी भिती होती. परंतू सुदैवाने दि.8 मेपासून दहा दिवसांपर्यंत नव्याने एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. टप्प्याटप्प्याने जिल्हयातील सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली. दि.18 मे रोजी जिल्हयातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. याचे श्रेय खर्‍या अर्थाने जिल्हयातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ठ नियोजन आणि नियमांचे पालन करणार्‍या नागरिकांना जाते. आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी तर स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. तसेच पोलीस विभागाने तर अत्यंत संवेदनशीलपणे गरीबांना अन्नधान्य वाटण्यापासून जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत चोखपणे हताळली.

जिल्हा कोरोनामुक्त झाला म्हणून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, यापुढे कोरोनाचा शिरकाव होणार नाही या अविर्भावात नागरिक बिनधास्तपणे तसेच निष्काळजीपणे फिरु लागले होते. त्यामुळे दोनच दिवसांनी कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक दोन दिवसाआड एक, दोन, पाच रुग्ण आढळू लागले. 13 जूनपर्यंत रुग्णांची संख्या 50 झाली. त्यानंतर मात्र 8, 10, 13 असे रुग्ण आढळू लागले. 13 जून ते 11 जुलै या 29 दिवसात जिल्हयातील रुग्णांची संख्या 197 ने वाढली. 24 आणि 25 जून या दोन दिवसात तब्बल साठ रुग्ण आढळले. तेव्हापासून रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. 21 रुग्ण असतांना 18 मे रोजी कोरोनामुक्त झालेल्या नंदुरबार जिल्हयात नंतरच्या एक सव्वा महिन्यातच तब्बल 136 रुग्ण वाढले. या आकडेवारीवरुन असे दिसून येते की आता कोरोनाने ‘कम्युनिटी स्प्रेड’कडे वाटचाल सुरु केली आहे. एकुण रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण हे नंदुरबार शहरासह तालुक्यातील आहेत. नंदुरबार शहरातील बहुतांश गल्ल्या, कॉलन्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे नंदुरबार शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

- Advertisement -

परंतू ही आकडेवारी का वाढत चालली आहे? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काही रुग्णांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्ष, क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. स्वच्छतागृहे हे सामुहिक वापरासाठी असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य आहे. त्यांची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे तेथे दाखल असलेल्या निरोगी रुग्णालादेखील संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील अस्वच्छता लक्षात घेता तेथील रुग्ण ‘येथे उपचार घेण्यापेक्षा आम्हाला होम क्वारंटाईन करा’ असे सांगू लागले होते. त्यामुळे रुग्ण तेथे प्रसन्नतेने राहू शकेल, असे वातावरण जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने तयार करण्याची गरज आहे. नंदुरबार जिल्हयात अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आहे. मात्र, त्या प्रमाणात त्या कक्षांमध्ये वैद्यकीय सेवा देणारे पथक कार्यरत आहेत का? त्या दर्जाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तेथे सेवा देत आहेत का? हादेखील प्रश्न आहे. कोविड तपासणी लॅबही त्वरीत सुरु करण्याची गरज आहे. कारण स्वॅबचा अहवाल धुळे येथून येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. नंदुरबारची लॅब सुरु झाल्यास लगेच अहवाल मिळून रुग्णांवर उपचार करणे सोपे जाणार आहे.

परंतू कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण आता कोरोनाची कम्युनिटी स्प्रेडकडे वाटचाल सुरु झाली आहे. या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण आले नाही तर नंदुरबारातील घराघरात कोरोनाचा रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तेव्हा वेळ हातून निघून गेलेली असेल. रुग्ण दाखल करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जागादेखील मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच म्हणतो, नंदुरबारकरांनो! अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सावरा, जिल्हा कोरोनामुक्त कसा होईल याचा विचार करुन जिल्हयातील सर्वच घटकांनी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन, तोंडावर मास्क, सॅनीटाईझरचा वापर या गोष्टी आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहेत असे समजूनच वाटचाल करा. विनाकारण बाजारपेठेत गर्दी करु नका, गटागटाने फिरु नका, गरज असेल तरच घराबाहेर पडा, स्वतःसह इतरांचीही काळजी घ्या, शासकीय नियमांचे पालन करा, घरीच रहा, सुरक्षित रहा, अन्यथा कोरोनाचे भुत आपल्या मानगुटीवरच बसलेले आहे, हे ध्यानात घ्या!

mo. 95525 76284

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या