नाशिक । विजय गिते
भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला असला तरी तो देशात अद्याप तरी प्रत्यक्षात उतरलेला नाही, मात्र नाशिकमध्ये या पक्षाची त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची चर्चा पक्षातच सुरू झाली आहे. एकेकाळी शहरावर प्रभुत्व गाजवणाऱ्या आपल्या पक्षाची झालेली अशी अवस्था पाहून निष्ठावंत कमालीचे व्यथित झाले आहेत.
नाशिक महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिला महापौर काँग्रेसचाच होता. त्यानंतरही सलग काही वर्षे महापौरपद काँग्रेसकडेच राहिले. मात्र, सद्यस्थितीत वत्सलाताई खैरे याच एकमेव गेल्या वेळच्या ज्येष्ठ नगरसेविका पक्षात राहिल्या आहेत. त्या देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी स्थिती आहे, कॉंग्रेसअंतर्गत मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरू झालेले असताना वरिष्ठ नेत्यांना शहर काँग्रेसच्या या दोलायमान स्थितीबद्दल काहीच देणे घेणे नाही का? अशा तीव्र भावना पक्षातूनच व्यक्त होताना दिसत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून गळती थांबविण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याची तक्रार कार्यकर्ते उघडपणे करत आहेत.
शहरातील खैरे कुटुंबाकडे काँग्रेसशी पूर्वीपासून एकनिष्ठ म्हणून पाहिले जाते. यातूनच या कुटुंबातील पंडीतराव खैरे काँग्रेसचे महापौर देखील होऊन गेले आहेत. मावळत्या सभागृहात खैरे कुटुंबातील शाहू खैरे व वत्सलाताई खैरे पक्षाचे प्रतिनिधित्व महानगरपालिकेत करत होते. मात्र, शाहू सोरे यांनीही जय श्रीरामचा नारा देत काँग्रेसला हात दाखवला. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेश सचिव, माजी नगरसेवक राहुल दिवे व माजी नगरसेविका आशा तडवी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
तत्पूर्वी, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील व जॉय (समीर) कांबळे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले डॉ. तुषार शेवाळे, त्यानंतरचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वीही काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांचा आश्रय घेतला आहे. काँग्रेसला लागलेली ही गळती अजूनही सुरूच आहे. ही ओहोटी थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कुठलेही प्रयत्न होत नसल्याची तीव्र भावना पक्ष सोडून गेलेल्या व चाललेल्या निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेतेच पक्षचिन्हावर न लढता स्वतंत्र चिन्ह घेऊन लढत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य, निष्ठावान कार्यकर्त्यांनी काय करावे, असा उद्विग्न सवाल नाराजांमधून व्यक्त होत आहे.
आता मदार यांच्यावरच
शहर काँग्रेसच्या माळेतील एक एक मणी आत्ता गळू लागला आहे त्यामुळे पक्षाची मदार आता शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल, ज्ञानेवर काळे, सुरेश मारू, वसंत ठाकूर, उल्हास सातभाई, हनीफ बशीर अशा मोजक्या निष्ठावंतांवरच आहे.




