Sunday, September 8, 2024
Homeनगरनगर पोलिसांबाबत पीएम मोदी, गृहमंत्री शहांना पत्र

नगर पोलिसांबाबत पीएम मोदी, गृहमंत्री शहांना पत्र

उच्चस्तरीय चौकशीची मागणी || तिसर्‍या दिवशीही खा. लंके यांचे उपोषण सुरूच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर पोलीस दलातील गैरप्रकाराबाबत खा. नीलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्याची विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी खा. लंके यांचे उपोषण सुरू होते.

- Advertisement -

नगर जिल्हा पोलिसांच्या भ्रष्ट आणि अनियंत्रीत प्रशासनासंदर्भात दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे 11 जुलै रोजी पत्राद्वारे केली होती. मात्र, त्यांच्याकडून काहीही कार्यवाही न झाल्याने 22 जुलैपासून नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असतानाही राज्य शासन अथवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उपोषण आंदोलनादरम्यान जिल्ह्याच्या विविध भागांतून सामान्य नागरीकांकडून असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारी अतिशय गंभीर आणि पोलिसांची प्रतिमा मलीन करणार्‍या आहेत. जिल्हा पोलीस दलातील भ्रष्ट आणि अनियंत्रीत प्रशासनाच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी तसेच संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात याव्यात, अशी विनंती खा. लंके यांनी केली आहे.

आ. तनपुरे यांची उपोषणाला भेट
नगरमध्ये खा. लंके यांच्या सुरू असणार्‍या उपोषणाला माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी बुधवारी भेट दिली. यासह दिवसभर जिल्हाभरातून मोठ्या संख्येने याठिकाणी नागरिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते येत असून पोलिसांच्या कार्यपध्दतीविषयी तक्रारी करण्यात येत असल्याची माहिती खा.लंके यांच्या यंत्रणेच्यावतीने देण्यात आली.

सुवर्णकार टार्गेट
जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील सुवर्णकारांना टार्गेट करण्यात येत असून तपासाच्या नावाखाली, गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याच्या नावाखाली दुकानातील माल ताब्यात घेतला जातो. सुवर्णकार बदनामीच्या भितीने, मारहाण व खोट्या धमक्यांना बळी पडून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांना पैसे देत असल्याचा आरोप यावेळी खा. लंके यांनी केला आहे.

तक्रारीसह पत्र
पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा ही गुन्हे रोखण्यासाठी की खंडणी वसूल करण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित करून ही शाखा गुंडगिरी पाठीशी घालून खंडणी वसूल करीत असल्याचे खा. लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. खा. लंके यांच्या उपोषणादरम्यान प्राप्त झालेल्या गंगापूर, शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील तक्रारीच्या प्रती पत्रासोबत पाठवलेल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या