Tuesday, September 17, 2024
Homeनगरआंदोलन थांबवण्यासाठी पाच कोटींची ऑफर

आंदोलन थांबवण्यासाठी पाच कोटींची ऑफर

खा. लंके यांचा गौप्यस्फोट || चर्चेनंतर समाधान न झाल्याने दुसर्‍यादिवशी आंदोलन सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मी आंदोलन करू नये, यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आले. पाच कोटी रुपये देतो, महिन्यालाही खिसा गरम करतो, अशीही ऑफर देण्यात आली, असा गौप्यस्फोट खा. नीलेश लंके यांनी मंगळवारी केला. जर हे लोक पाच कोटी रुपये देत असतील तर हे पैसे कुठून आले? असा सवाल खा. लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेमधील भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी केला. दरम्यान, मंगळवारी जिल्हाभरातील नागरिकांनी खा. लंके यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्या.

यावेळी खा. लंके म्हणाले, आपण हाती घेतला विषय शेवटला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. समाजाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. एका कर्मचार्‍याला दहा ते बारा वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाते. गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी 500 दिवस गैरहजर असताना त्यास पुन्हा हजर करून घेतले जाते. ज्या विभागातून निलंबित झाला त्याच विभागात संबंधित पोलीस निरीक्षक त्या कर्मचार्‍याला त्या विभागात बोलावून घेतो. आर्थिक संबंधातून अशा अनेक गोष्टी केल्या जातात.

त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी चुकीच्या पध्दतीने कामकाज केले आहे. याच शाखेचा कर्मचारी कोणत्या पोलीस ठाण्यात कोणता कर्मचारी बसवायचा हे ठरवितो. पोलीस अवैध व्यवसायांना पार्टनर आहेत. याचेही पुरावे आपल्याकडे असल्याचे खा. लंके यांनी सांगितले. आंदोलनातील मागण्यांसंदर्भात घनश्याम शेलार, बाळासाहेब हराळ, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड यांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, त्यात समाधान न झाल्याने उपोषण सुरूच होते.

ठोस निर्णयाशिवाय माघार नाही
चुकीच्या पध्दतीने काम करणारे अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत. तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. आंदोलनास किती दिवस लागतील हे माहिती नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय मी माघार घेत नाही, असे खा. लंके यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाच टक्क्यांमुळे यंत्रणा बदमान
पाच टक्के लोकांमुळे इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची बदनामी होत आहे. सामान्य पोलीस कर्मचारी रस्त्यावर राहतो, काम करतो त्यांना पगाराव्यतीरिक्त इतर कोणताही लाभ मिळाला नाही. चार सहा लोकांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा बदनाम केली असल्याचे लंके म्हणाले.

लंके यांनी केली स्वच्छता
सोमवारी आंदोलन सुरू झाल्यानंतर रात्रभर खा. लंके यांना भेटण्यासाठी नागरिक येत होते. मंगळवारी पहाटे चार वाजता ते झोपले आणि सहा वाजता उठले. उठल्यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी पाण्याच्या बाटल्या तसेच इतर कचरा स्वतः साफ करण्यास सुरूवात केली. लंके हेच काम करू लागल्यानंतर इतरांनीही त्यांचे अनुकरण केले.

प्रकृती स्थिर
जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलीस विभागाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर खा. लंके, त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले योगीराज गाडे, अशोक रोहोकले यांच्या प्रकृतीची तपासणी केली. खा.लंके यांच्या रक्तातील साखर काहीशी वाढली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गाडे यांचीही प्रकृती स्थिर असून रोहोकले यांच्या रक्तातील साखर मात्र वाढलेली आढळून आल्याचे वैद्यकिय पथकाने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या