Friday, November 22, 2024
Homeनगरलोकसभा निवडणुकीत पोलिसांनी माझेच सीडीआर काढले

लोकसभा निवडणुकीत पोलिसांनी माझेच सीडीआर काढले

खा. लंके यांचा गंभीर आरोप || एसपी कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेचा कारभार अत्यंत चुकीच्या पध्दतीने सुरू आहे. जिल्ह्यातील सराफांच्या तक्रारी असून, त्यांच्याकडून दोन महिन्यांत अडीच कोटी रुपये वसूल केले. लोकसभा निवडणूक काळात तर माझेच मोबाईल ट्रेस केले, सीडीआरही काढले, असा गंभीर आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला.

- Advertisement -

जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप करत खासदार लंके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत पोलिसांच्या कारभारावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात माझे मोबाईल ट्रेस केले. सीडीआर काढले. काहींनी पोलिसांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तर त्यांच्या अधिकार्‍यांचे, कर्मचार्‍यांचे फोनही हे टॅप करतात, असा दावाही लंके यांनी केला. स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्ट कर्मचारी तत्काळ निलंबित करावेत, निरीक्षक दिनेश आहेर यांना एलसीबीतून तत्काळ हटवावे, अशी मागणी खासदार लंके यांनी यावेळी केली.

शहरासह जिल्हाभरात शेअर ट्रेडिंगमध्ये फसवणूक, चंदन चोरी, पेट्रोल – डिझेल चोरी, बिंगो जुगार असे अनेक अवैध धंदे स्थानिक गुन्हे शाखेच्या आशीर्वादानेच सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचारी यात पार्टनर आहेत, असा गंभीर आरोपही खासदार लंके यांनी केला. अवैध धंदे बंद झाल्याशिवाय जिल्ह्यातील आमच्या माताभगिनी सुखी होणार नाहीत. त्यामुळे अवैध धंदे बंद करायचेत. ठोस रिझल्ट मिळाल्याशिवाय येथून हटायचे नाही, असा निर्धार लंके यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, खासदार लंके यांच्यासह सहकार्‍यांनी भ्रष्टाचाराची प्रतीकात्मक मडकी घेऊन आंदोलनस्थळी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड आदींसह महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. खासदार लंके यांनी भ्रष्टाचाराची प्रतीकात्मक मडकी फोडून पोलिसांचा निषेध केला. दरम्यान, खासदार नीलेश लंके हे दुपारनंतर मुंबई व तेथून अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार होते. मात्र, त्यांनी तिकीट रद्द केले आहे. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून अद्यापही वरीष्ठ अधिकार्‍यांनी लंके यांच्याशी चर्चा केलेली नाही. सायंकाळी लंके यांच्या काही सहकार्‍यांनी पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतल्याचे समजते.

ताबेमारीवरून आरोप
उपोषणस्थळी राजकीय नेत्यांसह नागरिकांनीही तक्रारी केल्या. किरण काळे, अभिषेक कळमकर यांनी शहरात लोकप्रतिनिधींचे गुंड कार्यकर्ते ताबेमारी करून जागा बळकावत असल्याचे आरोप केले. खोसपुरी येथील हरिभाऊ आहेर यांनी पांढरीपूल भागात अवैध धंदे सुरू असून काही नेते तेथे मनोरंजनासाठी येतात, त्यामुळे पोलीस कारवाई करत नाही, अशी तक्रार केली. तर एका शिक्षिकेने स्वतःच्या पोराला सोडवण्यासाठी अडीच लाखांचे दागिने पोलिसांना करून दिल्याचा आरोप केला. काही सराफ व्यावसायिकांनी आंदोलनस्थळी लंके यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडले.

पोलिसांकडून अशाप्रकारे कोणाचेही फोन टॅप होत नाहीत. एखाद्या गुन्ह्यात तपासासाठी सीडीआर काढले जातात. मात्र, खासदार नीलेश लंके यांचे कोणतेही सीडीआर लोकसभा निवडणूक काळात काढलेले नाहीत किंवा त्यांचे मोबाईल लोकेशनही ट्रेस केलेले नाही, असे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्पष्ट करत खा. लंके यांचे आरोप खोडून काढले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या