पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
लोकसभा निवडणुकीमध्ये बड्या पुढार्यांनी समोराचा उमेदवार मोठा म्हणून त्यांचे टेंडर घेतले, स्वाभिमानी मतदारांनी निवडणूक हाती घेत मला विजयी केले. विधानसभा निवडणुकीतही पारनेर-नगर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार असून राज्यात आघाडीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विरोधात असलेल्या विरोधकांनी झाले गेले विसरून एकत्र येण्याचे आवाहन खा. नीलेश लंके यांनी केले.
कर्जुलेहर्या येथे आयोजित कार्यक्रमात खा. लंके बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभावती घोगरे होत्या. खा. लंके म्हणाले, टाकळीढोकेश्वर गटाने लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य दिले.
सर्वसामान्य मतदारांनी ही निवडणूक हाती घेत या गटावर कोणाचीही मक्तेदारी नाही हे मतपेटीतून दाखवून दिले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा तसेच अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्वच पुढारी आपल्या विरोधात होते. पुढारी प्रवरेच्या पॅकेजमागे गेल्याचा टोला खा. लंके यांनी लगावला. करोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये मी पैसे खाल्ल्याचा बेछूट आरोप निवडणुकीच्या काळात करण्यात आला. मी जर एक रुपयांचाही गैरव्यवहार केला असेल तर माझे वाटोळे होईल. आरोप करणारे तुम्ही किती लायकीचे आहात ? हरेश्वराच्या पिंडीवर हात ठेवण्याची तुमची तयारी आहे का ? असा सवाल करत खा. लंके यांनी आरोप करणार्या विरोधकांना आव्हान दिले.
कर्जुलेहर्या येथील टोपीवाल्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठी मेहनत घेतली. या टोपीवाल्यांची आता यादी करा. त्यांना विमानाने दिल्लीला घेऊन जाऊन संसद दाखविण्याची माझी इच्छा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनीही मला साथ दिली. पाच वर्षांनंतर ते माझेच मतदार असणार आहेत. या विद्यार्थ्यांना मुंबईचे अधिवेशन दाखविणार असल्याचे लंके यांनी यावेळी जाहीर केले.
प्रवरेच्या घोगरे यांनी निवडणुकीत स्टार प्रचारकाची भूमिका प्रामाणिकपणे निभावली. विधानसभा निवडणुकीत त्यांची सावड आपल्याला फेडावी लागेल. उधारी चुकती करण्यासाठी राहाता मतदारसंघात जाऊन त्यांच्या विजयासाठी परिश्रम घ्यावे लागतील, असे खा. लंके यावेळी म्हणाले.