अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आपण समाजकार्यात काम करणारी माणसं. कोणीही गाडीला हात केला की थांबतो. त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी हात केला. मी थांबलो. त्यांनी चहा प्यायला चला म्हणून सांगितले. आम्ही चहा घेतला…त्यांनी माझा सत्कारही केला. तोपर्यंत मला समोरील सन्माननीय व्यक्ती कोण व त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे माहिती नव्हते. नंतर मला कळाले की ज्यांना आपण भेटलो ते अशा अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती. मला आधी माहिती असते तर मी तेथे गेलो नसतो. ही घटना अपघाताने घडली. तरीही ती चूकच म्हणावी लागेल, असा खुलासा नगरचे खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील गुंड गजा मारणे यांच्याकडून स्वीकारलेल्या सत्कारावर केला आहे.
गुरुवारी पुण्याच्या दौर्यात असताना त्या व्यक्तीची झालेली भेट ही अपघाताने झाली होती. सांत्वनपर भेट घेऊन परतत असताना ती व्यक्ती भेटली, ती व्यक्ती कोण ? तिची पार्श्वभूमी काय याबाबत मला काहीही माहिती नव्हते. ती व्यक्ती गुंड आहे हे मला शुक्रवारी सकाळी वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून समजले. अर्थात अपघाताने भेट झाली तरी ती चूकच होती अशी कबुली खा. लंके यांनी दिली. लंके म्हणाले, दिल्लीमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून गुरुवारी मतदारसंघात जाताता पुणे विमानतळावर मी उतरलो. पुण्यात कुस्तीमधील नामांकित मल्ल असलेल्या पवार यांचे कॅन्सरच्या आजाराने आठ दिवसांपूर्वी दुर्दैवी निधन झाले.
त्यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी विमानतळावरून मी गेलो होतो. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे पदाधिकारी धनवे यांच्या घरी भेट देऊन परतत असताना संबंधित व्यक्तीने मला घरी चहा पिण्यासाठी येण्याचा आग्रह धरल्याचे लंके म्हणाले. मला जर वस्तुस्थिती काय आहे हे माहिती असते तर मी थांबलोच नसतो. केवळ अपघाताने हा प्रकार घडलेला आहे. अशा प्रकारांशी अथवा संबंधित व्यक्तीशी माझा कोणताही हितसबंध नसल्याचे लंके यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांचा सल्ला
निलेश लंके गजा मारणे भेटीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी कार्यकर्त्यांनाच विशेष सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. निलेश लंकेंनी चुकून तेथे गेलो हे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी माफीदेखील मागितली आहे. मी देखील या प्रकाराबाबत माफी मागतो असे रोहित पवार म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांनी नेत्याला कुठे नेतो हे चेक करावे आणि याबाबत कुणीही राजकारण करू नये, असे आवाहनही पवारांनी केले आहे.