Friday, October 2, 2026
Homeनाशिकसायंकाळच्या लोडशेडिंगमुळे होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबवा; ग्रामीण भागातील विजपुरवठ्यावरुन खासदार वाजे आक्रमक

सायंकाळच्या लोडशेडिंगमुळे होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबवा; ग्रामीण भागातील विजपुरवठ्यावरुन खासदार वाजे आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी
ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या वेळेत होत असलेल्या खंडिती वीज पुरवठ्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता अनिल थोरात आणि कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती, दुग्धव्यवसाय, पिण्याचा पाणीपुरवठा तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असलेल्या परिणामाकडे त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतीपंपांसाठी वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात जावे लागते. त्यामुळे बिबट्या व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

तसेच अनेक गावांमध्ये नवीन फीडर उभारणी, कृषी फीडर विभक्तीकरण, क्षमतेत वाढ, डीपी व इतर विद्युत पायाभूत सुविधांची कामे मंजूर असूनही ती संथ गतीने सुरू असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. ही सर्व प्रलंबित व रेंगाळलेली कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Nashik News: पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था, विविध विभागांच्या कामकाजाचा आढाव घेण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन

शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक प्रकरणाचा आढावा घेण्याचे तसेच आवश्यक तेथे तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही खासदार वाजे यांनी दिले. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत होणारे लोडशेडिंग कमी करण्यासाठी आणि नागरिकांना पूर्वकल्पना देऊनच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन प्रलंबित फीडरची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....