नाशिक | प्रतिनिधी
शहरात मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall In Nashik) निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, नागरिकांचे झालेले नुकसान तसेच महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात नाशिक महानगरपालिकेची (Nashik Municipal Corporation) विशेष महासभा (Special General Body Meeting) बोलावण्यात येणार असल्याची घोषणा महापौर हिमगौरी आडके आहेर (Mayor Himgauri Adke Aher) यांनी केली आहे.
या विशेष महासभेत शहरात पावसामुळे रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, विविध भागांत साचलेल्या पाण्याची समस्या, पडझड झालेल्या झाडांची माहिती, आपत्ती व्यवस्थापन विभागाची कामगिरी तसेच सिंहस्थाच्या कामाच्या आढाव्याबाबत तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर त्वरित निर्णय घेण्यासह संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
महापालिकेच्या अभियांत्रिकी, विद्युत, आरोग्य, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित विभागांकडून पावसादरम्यान करण्यात आलेल्या कामांचा अहवालही महासभेत सादर केला जाण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीला अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.




