मुंबई | Mumbai
काँग्रेस नेते भाई जगताप (Congress Leader Bhai Jagtap) यांनी मनसे (MNS) व शिवसेना (उबाठा) बाबत एक विधान केले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) काय, आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतही आघाडी करून लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना देखील हीच भूमिका घेतली होती आणि आजही तीच भूमिका कायम आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर राज्यातील इतर काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राज ठाकरेंना विरोध दर्शवला आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधानच (Prime Minister) करायचा होता. पण होऊ शकला नाही. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला, तेव्हा आम्हाला राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधान करायचे होते. त्यावेळी आम्ही असे म्हणालो नाही की, शिवसेनेचा करायचा आहे की अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस (Congress) दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आमचे मन फार मोठे आहे आणि आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाच पंतप्रधान करायचे आहे. हे महाशय मुंबईच्या महापौराबद्दल काय घेऊन बसले आहेत? तुम्ही 27 महानगरपालिकेचे महापौर काँग्रेसचे करा. आम्हाला काही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाला रोखणं ही आमची भूमिका आहे. महापौर हा मराठी मातीतला होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत. मुंबईवर गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर झालेला आहे. त्याचे श्रेय हे शिवसेनेला (Shivsena) द्यावे लागेल. अनेकदा आम्ही काँग्रेसचे देखील सहकार्य घेतले हे आम्हाला विसरता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलताय? बाहेर काय बोलताय? मला वाटत नाही की, काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहेत. हा त्यांचा अंतर्गत वाद उफाळून आला असेल, असा म्हणत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला.
मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही मित्र पक्षांना अडचणीत येणारी कोणतीही भूमिका घेणार नाही. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यामुळे कोणी भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे. या मुंबईसाठीच (Mumbai) संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यात सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. आता त्याच प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे, असे खा. राऊत यांनी म्हटले आहे.




