मुंबई | Mumbai
देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे काल नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) त्र्यंबकेश्वर आणि मालेगावच्या दौऱ्यावर (Malegaon Tour) होते. यावेळी बोलतांना त्यांनी शरद पवारांनी (Sharad Pawar) सहकार मोडीत काढला, अशी टीका केली होती. यानंतर आता शहा यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “अमित शहा महाराष्ट्रातील (Maharashtra) नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येतात. अमित शहा देशाचे सहकारमंत्री असून ते जन्माला आले नव्हते तेव्हापासून या महाराष्ट्रामधले सहकार हे देशाला एक मार्गदर्शक आणि आदर्श आहे. अमित शहा म्हणतात म्हणून त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असे नाही. जे काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात आहे त्यांना फोडण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सहकार कारखान्याचे संचालक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि दबाव आणला, असे त्यांनी म्हटले.
तसेच अनेक कारखानदार या महाराष्ट्रात दिल्लीला (Delhi) बोलविले जातात. कारखानदार यांच्यावर दबाव आणला जात आहे.किंबहुना कोविड काळात गुजरातमधील सहकार बँकेत घोटाळे झाले, हे जगाला माहिती आहे. एक कारखाना बंद पडला तर हजार कुटुंबाचे नुकसान होते. मुळात अमित शहा यांच्यावर टीका केली म्हणून या टीकेवर एकनाथ शिंदे यांना उत्तर देणाचे कारण काय? उत्तर द्यायला भाजपचे नेते आहेत, मात्र हे दिल्ली पुढे लाचार असल्याने त्यांना बोलावे लागते”, अशी टीकाही राऊत यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, “जमालगोटा कोण कोणाला देत हे पाहुया, हाच जमलगोटा एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) देखील मिळाला होता. लवकरच राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री (DCM) मिळणार असून हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला माहिती असेल. ईडीचा जमालगोटा दिला म्हणून तुम्ही फुटला, आमच्याकडे ईडी आणि सीबीआय आला तर आम्हीही जमालगोटा देऊ आणि ७२ तास संडासात बसवू, जमालगोटा आम्हाला सांगू नका. या जमालगोट्याच्या गोळ्या ईडी आणि सीबीआयच्या असून त्या शिंदे गटालाही (Shinde Group) दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची पोपटपंची सुरू आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आक्रमण केले असून ते महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे बोलले असतील तर शिंदेंनी बोलले पाहिजे. शिंदेंना जो दिल्लीतून जमालगोटा दिला जात असतो, त्यामुळे शिंदे तोंडाने उलट्या करत आहेत” अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.