पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
जीवनात कोणत्याही समस्येला तोंड देण्याची धमक निर्माण करणारे शिक्षण भावी पिढीला देणे गरजेचे असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील सुपा येथे सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रयत संकुलाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य मंगेश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी माजी विद्यार्थी, लोकवर्गणी व रयत सेवकांच्या कृतज्ञता निधी या माध्यमातून ही वास्तू उभी राहिल्याचे सांगितले. सुपा एमआयडीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतालय, संरक्षक भिंत आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख केला. यावेळी माजी विद्यार्थी अप्पर जिल्हाधिकारी बन्सी गवळी, विशेष कार्यकारी अधिकारी देवराम पळसकर, उद्योजक अशोक माने, सुरेश अग्रवाल, एपिटॉम सिमा कंपनीचे अध्यक्ष अनुराग धूत, आयडीएल, जाफा, मिंडा, एपिटॉम या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
शरद पवार पुढे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेत शिकणार्या विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण दिले जाते.
यावेळी खासदार निलेश लंके, रयतचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, संघटक अनिल पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, माजी आमदार राहुल जगताप, संस्थेचे अधिकारी, सुप्याच्या सरपंच मनिषा रोकडे, माजी सभापती दीपक पवार, माजी सरपंच राजू शेख, माजी सरपंच विजय पवार आदी उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील 1999-2000 च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेच्या फर्निचरसाठी 35 हजार 500 रुपयांच्या मदतीचा धनादेश पवार यांच्या हस्ते विद्यालयास दिला. न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.




