मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर रविवारी मेळावा झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी पुण्याचे प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युगेंद्र पवार यांच्यासह पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना सुळे यांनी महायुतीच्या (Mahayuti) कारभारावर जोरदार टीका करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
यावेळी बोलतांना सुळे म्हणाल्या की,”शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र, जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. त्याची विकेट जाईल”, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच “बरे झाले पक्ष फुटला.जो दोन मुले असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो. अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की,”बीड (Beed) येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि महादेव मुंडे यांची घरी एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यांची हे गम्मत बघत होते, किती ही विकृती आहे. हे वास्तव आहे. अवादा कंपनीला काम देऊ नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र दिली आहेत. पत्रही यांनीच द्यायची, खंडणीही यांची गोळा करायची, या हक्काचा अक्का तोच आहे असे म्हणत एक वेळ विरोधात बसेन. मात्र, नैतिकता सोडणार नाही”, असे त्यांनी सांगितले.