Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधमुदगरो मधुर

मुदगरो मधुर

एक शुभ्र, सुगंधित टवटवीत फूल, ज्याच्या दरवळाने मनाचा थकवा दूर होऊन मन प्रसन्न होते. अशी निसर्गाची एक सुंदर देणगी मोगरा! प्रत्येक स्त्रीच्या मनाचा एक हळवा कोपरा व्यापणार त्याच्या अस्तित्वाने!

प्राचीन काळापासून सुगंधी पुष्पांचा उपयोग पूजा तसेच औषधी स्वरुपात केल्याचे संदर्भ अनेक ठिकाणी मिळतात. आयुर्वेदात भावप्रकाश या ग्रंथात पुष्पवर्ग सांगितला आहे. यात विविध प्रकारच्या फुलांची विशेष माहिती सांगितली आहे. मोगर्‍या संदर्भात पुढील उल्लेख आढळतो.

- Advertisement -

मुद्गरो मधुर, गीत सुगन्धिश्च सुखप्रद :।

कामवृद्धिकरश्चैव पित्तनाशकरो मत:॥ निधण्डु रत्नाकर

मोगर्‍याचे फुल मधुरे म्हणजे थंड गुणधर्माचे, सुखदायी, कामवृद्धी करणारे व पित्तनाशक असे सांगितले आहे.

मोगरा ही सुवासिक फुलांची वनस्पती झुडुपाप्रमाणे वाढणारी असते. फुले शुभ्र एकेरी पाकळ्यांची अथवा दुहेरी पाकळ्यांची असून अत्यंत सुवासिक असतात. वर्षभरात उन्हाळी व पावसाळी असे फुलांचे दोन हंगाम असतात. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यात फुलांचा मुख्य हंगाम असतो. मोगरा हे सर्वसाधारण नाव असले तरी यामध्ये सिंगल, डबल, गुंदुमलई, मोनिया, बटमोगरा, वसई, मदनबाण अशा वेगवेगळ्या जाती असून कमी अधिक फरकाने या सर्वांची फुले एकसारखी असतात. फुलातील अर्काचा अर्थात बाष्पनशील तेलाचा उपयोग अत्तर, साबण, अगरबत्ती इ. मध्ये करण्यात येतो. सध्याच्या धावपळीच्या व्यस्त दैनंदिनीच्या काळात येणारा मानसिक थकवा घालविण्यासाठी जी अरोमा थेरपी आजकाल वापरली जाते तिथेही याचा उपयोग केला जातो.

मोगर्‍याचा बहर विशेषत: उन्हाळ्यातच येतो. अशा काळात वाढलेल्या उष्णतेमुळे नाकात फोड येतो. त्यावर मोगर्‍याच्या फुलांचा नुसता वास घेतल्याने बरे वाटते. पिण्याच्या पाण्यात मोगर्‍याची फुले टाकली असता ते सुगंधी बनते व असे सुगंधी पाणी पिण्याने उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

मोगरा ही प्रजाती …. कुळातील आहे. या प्रजातीत जाई, जुई अशा सुमारे 200 विविध सुवासिक फुलांचा समावेश होतो. मोगर्‍याला विविध भाषांमध्ये विविध नावांनी ओळखले जाते. जसे कन्नडमध्ये याला मल्लिगे, इरावंतिगे म्हटले जाते. गुजरातीमध्ये मोगरो या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये अनंतमल्लिका, नवमल्लिका, प्रमोदिनी अशी विविध नावे आहेत तर हिंदीमध्ये वनमल्लिका, मोतिया, मोगरा या नावांनी मोगर्‍याला संबोधले जाते. मोगरा हे हवाई, इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांचे राष्ट्रीय फूल आहे.

भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश,कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या फुलांना बाजारपेठेत वर्षभर सतत मागणी असते.

वैद्य अश्विनी चाकूरकर

बाप रखुमादेवीवरू विठ्ठले अर्पिला

मोगरा फुलला मोगरा फुलला

फुले वेचिता बहरू कळियांसी आला।

इवलेसे रोप लावियले द्वारी।

तयाचा वेलू गेला गगनावरी॥1॥

मनाचिये गुंती गुंफीयेला शेला।

बाप रखुमादेवीवरू विठ्ठले अर्पिला॥

माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगात असे वर्णन करतात की, इवलेसे म्हणजे लहानसे रोप द्वारी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी लावले. याचा अर्थ प्रथम परमात्म्याच्या ठिकाणी माया मानली गेली. पुढे त्या मायारुपी रोपाचा वेल एवढा वाढला की तो आकाशाला जाऊन भिडला. याचा अर्थ पंचमहाभूते व त्याचे कार्य जी सृष्टी ती वाढली अशा तर्‍हेने त्या मोगर्‍याच्या वेलाचा विस्तार झाला. त्या वेलीला सुखदु:खाची फुले आली. ती फुले एवढी आली की, पहिला बहर तोडला की दुसरा बहर आलाच. पहिल्या कळ्या उमलल्या की त्या तोडल्याबरोबर दुसर्‍या लागोपाठ येऊच लागल्या असा हा मोगरा सुखदु:खाच्या फुलांनी फुललेला आहे.

ही सुखदु:खादि फुले मनाच्या दोर्‍यात ओवून त्या फुलांचा एक शेला तयार केला. … ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे

तैसे जे जाणिले यासाठी। संसार संसाराचिये गाठी। लाऊनी बैसवी पाठी।

मोक्षश्रियेच्या या ओवीमध्ये पहिल्या संसार शब्दाला अर्थ सुखदु:खे जन्म मरणादि असा आहे. दुसर्‍या संसार शब्दाचा अर्थ मन असा आहे. म्हणजे सुखदु:खादी संसार हा त्या मनाचा आहे. म्हणजे मन कल्पित आहे. असे जाणून मोक्षक्रियेच्या सिंहासनावर बसावे. याप्रमाणे सुखदु:खादी फुले ही मनाच्या सुतात ओवून म्हणजे सुखदु:खादिक हे मनाचे धर्म आहेत असे समजून तो शेला रखुमादेवीवर बाप जो श्रीविठ्ठल त्याला मी अर्पण केला. दुसरा अर्थ असा की, परमार्थाला लागल्यानंतर नामस्मरण आदी भक्तीचे लहानसे रोप परमात्म्याच्या द्वारात लावले. पण त्याचा विस्तार एवढा झाला की, तो वेल चिदाकाशापर्यंत वाढत गेला. त्याला ब्रह्मसुखाची फुले आली. ती ब्रह्मसुखाची फुले जेवढी घ्यावीत तेवढी अधिकच येऊ लागली.

सदा नामघोष करू हरिकथा

या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे

सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार॥

अशी सुखाची फुले त्या मोगर्‍याच्या लहानशा रोपाला म्हणजे नामस्मरण, भक्तीला आली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती फुले मनाच्या दोर्‍यात गुंफून त्यांचा सुंदर असा शेला तयार करून माझ्या रखुमादेवीवर श्री विठ्ठलाला मी अर्पण केला.

रामकृष्ण हरी.

दीपक डावरे

कीर्तनकार

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या