Friday, November 15, 2024
Homeनगरजिल्ह्यात 83 हजार ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज दाखल

जिल्ह्यात 83 हजार ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज दाखल

नोंदणीसाठी आता दोन दिवसांची विशेष मोहीम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना कोणत्याही अडथळ्याविना अर्ज भरता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आज शुक्रवारी (दि. 12) व शनिवारी (दि.13) अशी दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेत 83 हजार 489 महिलांनी ऑफलाईन अर्ज केले आहेत. यातून 36 हजार 392 अर्ज ऑनलाईन भरण्यात आले आहेत. उर्वरित अर्जही ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया अंगणवाडीसेविका करत असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

बहिण माझी लाडकी योजनेसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या मोहिमेच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार माहितेसाठी आज 12 आणि उद्या 13 जुलै रोजी दोन दिवसीय विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. यात ग्रामपंचायत, वाडी-वस्ती आणि वॉर्डस्तरावर योजनेचा प्रचार केला जाईल. शिबिरस्थळी पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य सेवा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असतील. विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, मदतनीस, सेतू केंद्र कर्मचारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांची पथके तयार केली जातील. शिबिरांमध्ये जास्तीत जास्त अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

महानगरपालिका, गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकार्‍यांना शिबिर आयोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विविध शिबिरांना भेट देतील. योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोहिमेचा अहवाल 15 जुलै रोजी सादर करायचा आहे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत, असल्याची माहिती नोडल अधिकारी मनोज ससे यांनी दिली.

जिल्हाधिकारी, सीईओ शिबिरांना भेटी देणार
या दोन दिवसांच्या मोहीम कालावधीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ हे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिबिर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मोहिमेचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांनी मुख्यालयी उपस्थित राहावे. तसेच या मोहिमेत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 15 जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अशी आहे नोंदणी
अंगणवाडी सेविका 48 हजार 839, ग्रामसेवक 17 हजार 430, सीआरपी 4 हजार 413, नगर पालिका 5 हजार 586, नगर पालिका 3 हजार 916 आणि सेतू केंद्र 3 हजार 395 अशी नोंदणी झालेली आहे. यात नारी शक्ती अ‍ॅपमध्ये 13 हजार 368, ऑनलाईन नोंदणी 36 हजार 392 यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी ऑफलाईन भरलेल्या अर्जाची नोंदणी ऑनलाईन झाल्यानंतर सध्याचा आकडा दीडपट वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या