Tuesday, September 17, 2024
Homeनगरमुळा धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू

मुळा धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातून जायकवाडीच्या दिशने कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याहस्ते कळ दाबून काल सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता धरणाच्या 11 दरवाजांतून 2000 क्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26 दलघफू एवढी आहे. आज मितीला धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. मुळाधरणात धरणात सध्या 22 हजार 860 (87 टक्के) दलघफू पाणी साठा असून धरणात 2 हजार 247 क्युसेकने आवक सुरू आहे. हा साठा दि. 15 ऑगस्टपर्यंत कायम ठेऊन विसर्ग कमी- जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे काल सोमवार दि. 12ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता मुळा धरणातून 2 हजार क्युसेकने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यावेळी प्रशासनाच्यावतीने मुळानदी काठच्या गावांना तीन वेळा सायरन वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असून मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवित व वित्त हानी होणार नाही. याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जरी पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पाणलोट क्षेत्रात मात्र, पावसाचे प्रमाण अतिशय अल्प असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता.

मागील आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाल्याने धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला. मात्र, आता पाणलोट क्षेत्रात होणार्‍या कमी पावसाने धरणातील पाण्याची आवक खूपच कमी-जास्त होत आहे. धरणात होत असलेली पाण्याची आवक व पाणी साठा या आकडेवारीकडे नदीकाठच्या शेतकर्‍यांचे लक्ष लागून होते. काल धरणातून नदी पात्रात काही का होईना पाणी सुटल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे. यावेळी उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे, स्थापत्य सहाय्यक सलीम शेख, सुनील हरिश्चंद्रे, आयुब शेख, दिलीप कुलकर्णी, वैशाली साबळे, प्रिया कचरे, मुज्जफर देशमुख आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या