Sunday, September 15, 2024
Homeनगरमुळातून पाणी सोडले, भंडारदरातून 10032 क्युसेकने विसर्ग

मुळातून पाणी सोडले, भंडारदरातून 10032 क्युसेकने विसर्ग

4 हजार क्युसेकने पाणी मराठवाड्याकडे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील मुळा धराणातून जायकवाडीसाठी 4 हजार क्युसेकने पाणी झेपावले असून पाणी सोडण्याबाबत फक्त समाज माध्यमांवर विरोध होत असताना प्रत्यक्षात धरणाकडे कोणीही फिरकला नसल्याने धरणाच्या 11 दरवाजांतून विना अडथळा जायकवाडीच्या दिशेने विसर्ग वाहता झाला आहे.

काल समाज माध्यमावर पाटबंधारे विभागाकडून दुपारी 12 वाजता मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच धरणावर सायरनही वाजविण्यात आलेे होते. राहुरी नगरपरिषद व मुळानदी काठच्या गावातील ध्वनीक्षेपकावरून दवंडी सुध्दा देण्यात आली होती. मात्र, पाटबंधारे विभागाच्या आधिकार्‍यांना 3 वाजेपर्यंत पाणी न सोडण्याचे वरिष्ठांचे आदेश आल्याने मराठवाडा, नगर व नाशिकच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांची फेर नियोजनाबाबत बैठक झाल्याचे समजते. त्यानंतर दुपारी 3 वाजता पुन्हा सायरन देऊन मुळा धरणाच्या 11 दरवाजांतून नदी पात्रात 4 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर रात्री 9 वाजता खालील परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्ग वाढवून टप्प्याटप्प्याने 8 हजार क्युसेक करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून समजते.

दरम्यान, पाणी सोडण्यापुर्वी मुळानदीवरील डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजूळपोई या बंधार्‍यांच्या फळ्या काढण्यात आल्या होत्या. काल मुळाधराणावर सकाळीच मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाअभियंता राजेंद्र पारखे, सहाय्यक सलीम शेख, सुनिल हरिश्चंद्रे, कर्मचारी अयुब शेख, जायकवाडी धरणाचे उपअभियंता गोकुळे यांसह दोन शाखाअभियंता, कालवा निरीक्षक दिनकर लातपटे, बी.एम. टेकूळे, संदीप अंभोरे, एम.वाय.पुंड तसेच दोन पोलीस कमचारी आदींच्या उपस्थितीत पाणी सोडण्यासाठी हलचाली सुरू झाल्या होत्या. 26 हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये 22 हजार 806 दलघफू पाणीसाठा असून त्यापैकी 2 हजार 100 दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने रवाना होणार आहे.

राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाणी सोडण्यास अडथळा निर्माण होईल, असे बोलले जात असताना कोणताही राजकीय नेता अथवा सामाजिक कार्यकर्ता धरणकडे फिरकला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाला पाणी सोडताना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.

सिंचनासाठी एक उन्हाळी आवर्तन कमी होण्याची शक्यता

मुळा धरणातून सिंचनासाठी खरीप, रब्बी, तसेच उन्हाळी आवर्तन सोडले जाते. परंतु, या वर्षी जायकवाडीसाठी मुळाधरणातून 2.10 टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने यंदा एक उन्हाळी आवर्तनाची कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच इतरही आवर्तन सुरू ठेवण्याचा कालावधी घटणार आहे.

गोदावरीतून 14 हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे झेपावले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणा पाठोपाठ नाशिकच्या गंगापूर, कडवा, मकणे धरणातूनही जायकवाडीसाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दारणातील विसर्ग वाढवत 7074 क्युसेक इतका करण्यात आला. तर काल सायंकाळी 5 वाजता नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत प्रत्यक्षात 3228 क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली. हा विसर्ग सकाळपर्यंत 14 हजार क्युसेकपर्यंत जाऊ शकतो.

काल रविवारी सकाळी दारणातून 450 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो नंतर 642 क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग दुपारी 12 वाजता 1092 करण्यात आला. तासाभराने 1 वाजता तो 1560 क्युसेकने वाढवून 2652 क्युसेकवर नेण्यात आला. दुपारी 2 वाजता या विसर्गात 3044 क्युसेक ने वाढ करत 5696 क्युसेक इतका करण्यात आला. पावर हाऊस मधुन 1100 क्युसेक, दारणाच्या रेडीयल गेट मधुन 4566 क्युसेक, तर 30 क्युसेक लिकेज मधुन बाहेर पडत आहे. असे एकूण 5693 क्युसेक विसर्ग सुरु होता.5 वाजता हा विसर्ग 7074 क्युसेक इतका करण्यात आला. तो काल उशीरा पर्यंत टिकून होता. दारणा समुहातील दारणा सह कडवाच्या सांडव्यातून 3248 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तर मुकणे धरणातून 1100 क्युसेकने विसर्ग सुरु होता. असा दारणा समुहातून 11422 क्युसेक इतका विसर्ग गोदावरीच्या दिशेने जायकवाडीसाठी सोडण्यात येत आहे. दारणा समुहातून 2.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. या वेगाने विसर्ग सुरु राहिला तर तीन दिवसांत दारणा समुहाचा जायकवाडीला जाणारा कोटा पूर्ण होऊ शकतो. धरणं बंद केली तरी पुढे तीन दिवस पाणी नदीपात्रात प्रवाहित राहु शकते.

दरम्यान, दारणा पाठोपाठ गंगापूर सह अन्य दोन धरणांमधून पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. काल सकाळी 10 वाजता 1055 क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली.तो दुपारी 2 पर्यंत 4726 क्युसेक करण्यात आला. पुन्हा अर्ध्या तासाने काहीसा कमी करत 3671 क्युसेक वर आणण्यात आला. पुन्हा 5 वाजता तो 2616 क्युसेक वर आणण्यात आला. नाशिक शहरात गोदावरीचे पात्र उथळ असल्याने तेथे पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गगापूर समुहातून अर्धा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

काल दारणा समुहातील व गंगापूर धरणातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल झाल्यानंतर काल सायंकाळी 5 वाजता गोदावरीत 3228 क्युसेक ने विसर्ग सुरु झाला आहे. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. सकाळ पर्यंत गोदावरीतील विसर्ग 14 हजार क्युसेकवर पोहचू शकतो. वरील धरणातील पाणी 48 तासानंतर जायकवाडीच्या बॅक वॉटर असलेल्या प्रवरासंगम येथे पोहचेल. तर उद्या कोपरगाव ला ओलांडेल.

नदीकाठ सुखावला !

गोदावरीतून पाण्याचा प्रवाह सुरु झाल्याने गोदाकाठावरील शेतकरी मात्र सुखावला आहे. काही अंशी पाण्याचा पाझर विहीरी, इंधनविहीरी यांना होवु शकतो. मात्र कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या विवंचनेत पडला आहे. पिके कशी जगतील ?

निळवंडे धरणातूनही पाणी वाढणार

भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara

मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याचे आदेश आल्यानंतर हे पाणी सोडणे सुरू आहे. काल सायंकाळपासून भंडारदरा धरणातून तब्बल 10032 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री 11 वाजता निळवंडे धरणातून 100 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पण भंडारदरातील पाणी या धरणात जमा होत असल्याने निळवंडेतूनही विसर्ग वाढविण्यात येत आहे.

काल रविवारी सकाळी 7 वाजता एकूण 2240 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 8947 दलघफू (81.05 टक्के) होता. सांडव्यातून 9213 आणि विद्युत गृह क्रमांक 1 मधून 820 असा एकूण 10032 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हे पाणी निळवंडेत जमा होत असून 5000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यातही वाढ होणार आहे.

सध्या खाली प्रवरा नदी दुथडी वाहत आहे. नदीला पाणी सोडल्याने नदीकाठचे शेतकरी समाधानी आहेत. कारण या पाण्यामुळे विहिरी आणि बोअरचे पाणी वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या