Saturday, May 4, 2024
Homeनगर‘मुळा-प्रवरा’च्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरु - खा. डॉ. विखे

‘मुळा-प्रवरा’च्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरु – खा. डॉ. विखे

लोणी |प्रतिनिधी| Loni

संघर्षानंतरही मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेचे अस्तित्व कायम ठेवून या संस्थेचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न मागील सात वर्षाच्या कार्यकाळामध्ये संचालक मंडळाने केला आहे. भविष्यातही संघर्ष संपवून सहकारी संस्था टिकविण्यासाठीच राजकीय भूमिकेच्या पलिकडे जाऊन विचार करावा लागेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, भानुदास मुरकुटे, सुभाष पाटील, इंद्रभान थोरात, जलिलभाई पठाण, अंबादास ढोकचौळे, सिध्दार्थ मुरकुटे, संजय छल्लारे यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

खा.डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, विद्यमान संचालक मंडळाला कोविडच्या कारणाने सातत्याने मुदतवाढ मिळत गेली. संस्थेच्या प्रश्नाबाबत सातत्याने सरकार, न्यायालयापुढे बाजू मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यामध्ये सहकारी संस्थेचे हित आणि शेतकर्‍यांना न्याय मिळावा, हीच भूमिका होती. प्रदिर्घ काळ या संस्थेने संघर्षही पाहिला. परंतु आता बदलता काळ पाहता सकारात्मक पावले पुढे टाकून जनतेच्या हितासाठी राजकारणविरहीत भूमिका घ्यावी लागेल. यासाठी सहकारातील ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजवावी, असेही त्यांनी सूचित केले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले, शेतकर्‍यांची पीकविमा योजनेत होत असलेली अडचण सोडविण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रातून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जिल्हा बँकेलाही एकरकमी कर्जफेड योजना सुरु करण्यास परवानगी मिळावी आणि मागील धोरणाप्रमाणेच साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या रॉ-शुगरच्या निर्यातीबाबत कोठाप्रणाली रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.

माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी राजकीय, सामाजिक जीवनात मोठे संघर्ष पाहायला मिळाले, मंत्रीपदावर काम करण्याची संधीही मिळाली. परंतु मुळा-प्रवरा संस्थेच्या चेअरमनपदावरुन जिरायती, बागायती पट्ट्यातील शेतकर्‍यांसाठी जे काम करता आले, त्याचे खूप समाधान आहे. मुळा-प्रवरा सहकारी संस्थेमुळेच श्रीरामपूर, राहाता आणि राहुरी तालुक्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या सभेत सर्व सभासद, कार्यकर्ते, संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. संस्थेचे संचालक दीपक शिरसाठ यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या