अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या मागणीनुसार मुळा उजव्या कालव्यातून आजपासून (19 डिसेंबर) आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे झालेल्या बैठकीत 35 दिवसांचे आवर्तन निश्चित करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले. मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी केली होती. याचे गांभीर्य लक्षात घेवून ना.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या आधिकार्यांसमवेत नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीस आ. शिवाजीराव कर्डिले, आ. विठ्ठलराव लंघे, आ. मोनिका राजळे, आ.काशिनाथ दाते यांच्यासह जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुळा उजव्या कालव्यातून आजपासून लाभक्षेत्रासाठी पाणी सोडण्यात येणार असून, 35 दिवसांचे आवर्तन निश्चित करण्यात आले आहे. आवर्तन मिळावे अशी शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून ना. विखे पाटील यांच्या पुढाकाराने याबाबतचा निर्णय करण्यात आला आहे. आवर्तनाच्या बाबतीत आधिकार्यांनी गांभिर्याने लक्ष द्यावे, पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळावे असे नियोजन करण्याच्या सुचना ना. विखे पाटील यांनी आधिकार्यांना दिल्या आहेत.