संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
अकोले तालुक्यातील मुळा नदीचा उगम असणार्या हरिश्चंद्रगड पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत चालली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील साकूरनजीक असणारा मांडवे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गेल्या बारा तासांपासून पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने पारनेर व संगमनेर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संगमनेर आणि पारनेर या दोन्ही तालुक्यांत जाण्यासाठी मुळा नदीवर मांडवे पूल असून नदीला पाणी वाढताच तो दरवर्षी पाण्याखाली जातो. त्यामुळे यावर्षी देखील मांडवे पूल कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच संगमनेर व पारनेर तालुक्याचा देखील संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच मुळा नदीला आलेला पूर बघण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जात असतात. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना व आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तसेच मुळा नदीकाठ परिसर व साकूर-मांडवे पुलावरून ये-जा करणार्या सर्व प्रवाशांना व ग्रामस्थांनी नदीला पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीपात्रात जाऊ नये, संततधार पावसामुळे व नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळी वाढत आहे तरी कोणीही नदीकाठावर अथवा पुलावर जाऊ नये, असे आवाहन संगमनेर व पारनेर प्रशासनाने केले आहे.