पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात विविध शाखा असलेल्या एका नामांकित मल्टीस्टेट सोसायटीमध्ये ठेवीदारांचे करोडो रुपये अडकले असून याच आर्थिक संस्थेची शहरातील बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर शाखा आहे. या शाखेतील एक सर्व सामान्य मोलमजुरी करणारा गरीब ठेवीदारांचे लाखो रुपये अडकल्याने व अनेकदा मागणी करूनही मिळत नसल्याने तो ठेवीदार मेटाकुटीला आला असून अखेर त्याने टोकाची भूमिका घेत प्रशासनाला मला आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हणत त्या आर्थिक संस्थेवर कारवाई करत न्याय देण्याची मागणी केली असून मला माझे पैसे व न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील भगवान शंकर केरकळ या रोजंदारीवर मोलमजुरीचे काम करणार्या ठेवीदाराचे सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये या मल्टीस्टेट संस्थेत अडकले असून त्यांनी वेळोवेळी मागणी करुनही त्यांना हे पैसे मिळत नसल्याने त्यांनी पाथर्डीच्या तहसीलदारांना आर्थिक फसवणूक झाल्याचे निवेदन दिले आहे. केरकळ हे स्वतः आजारी असून त्यांच्या वडिलांना देखील कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. त्यावर इलाज करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. केरकळ यांना शासनाने घरकुल मंजूर केले असून पैशाअभावी त्याचे काम देखील त्यांना करता येत नसून मंजूर घरकुल देखील नामंजूर करण्यात येईल अशी नोटीस त्यांना मिळाली आहे. या सर्व आर्थिक विवंचनेत हा ठेवीदार सापडला आहे. या सर्व परिस्थितीमुळे ठेवीदार नैराश्यात गेले आहेत. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गुंतवणूकदार अडचणीत
ग्रामीण भागातील अनेक ठेवीदार हे आर्थिक बाबतीत अशिक्षित असल्याने या संस्थांना ते बँक म्हणूनच संबोधतात. मागील काही वर्षांमध्ये शहरामध्ये श्रीनाथ मल्टीस्टेट, भाईचंद हिराचंद रायसोनी, बी एच आर, दत्त दिगंबर, लोकमंगल, आदर्श सारख्या अनेक संस्थांनी आपला गाशा गुंडाळला. शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावला. या तथाकथित बँकेच्या ठेवीदारांना, त्यांच्या खात्यात पैसे असूनही पैसे काढण्याच्या निर्बंधामुळे हाल झाले. या धक्क्याने काही ठेवीदारांचा मृत्यू झाला. काहींना पैसे काढण्याच्या निर्बंधामुळे, वैद्यकीय उपचार वेळेवर करता आले नाहीत. पैशाअभावी काहींचे लग्नसमारंभ, स्वमालकीचे घर, मुलांचे उच्च शिक्षणही रखडले. आता पुन्हा मल्टीस्टेट प्रकरणामुळे गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत.