Tuesday, February 3, 2026
HomeराजकीयSanjay Raut : "मुंबईतील बिहार भवनाच्या बदल्यात पाटण्यात महाराष्ट्र भवनासाठी…"; राऊतांचं फडणवीसांना...

Sanjay Raut : “मुंबईतील बिहार भवनाच्या बदल्यात पाटण्यात महाराष्ट्र भवनासाठी…”; राऊतांचं फडणवीसांना आवाहन

मुंबई । Mumbai

दक्षिण मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (MbPT) जागेवर उभारल्या जाणाऱ्या ३० मजली ‘बिहार भवन’वरून महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवल्यानंतर, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजे आहेत का? आम्ही मुंबईत बिहार भवन उभारणारच,” अशा शब्दांत चौधरी यांनी आगपाखड केली आहे. या वादात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही उडी घेतली असून खासदार संजय राऊत यांनी बिहार सरकारसमोर नवी अट ठेवली आहे.

- Advertisement -

बिहार सरकारने मुंबईत येणाऱ्या आपल्या नागरिकांच्या आणि रुग्णांच्या सोयीसाठी पोर्ट ट्रस्टच्या जागेवर ३० मजली भव्य इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने निधीची तरतूदही केली आहे. मात्र, मनसेने याला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. मुंबईत आधीच गर्दी आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर असताना अशा प्रकारे परराज्यातील भवन उभारण्यास मनसेचा विरोध आहे. मनसेच्या या भूमिकेनंतर बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेत राज ठाकरेंवर टीका केली, ज्यामुळे मनसैनिक अधिकच आक्रमक झाले आहेत.

YouTube video player

बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेल्या भाषेचा समाचार घेताना खासदार संजय राऊत यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. राऊत म्हणाले की, “भारतीय संविधानाने प्रत्येकाला देशात कुठेही राहण्याचा आणि नोकरी करण्याचा अधिकार दिला आहे, हे आम्हालाही समजते. मात्र, बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेली आव्हानाची भाषा अधिक सौम्य असायला हवी होती.”

राऊत यांनी बिहार सरकारला एक ‘सांस्कृतिक देवाणघेवाण’ म्हणून नवी अट घातली आहे. “तुम्हाला मुंबईत बिहार भवन बांधण्यासाठी जागा हवी असेल, तर ती जमीन तुम्ही पाटण्यावरून आणणार नाही, ती मुंबईचीच असेल. मग आमच्याही बदल्यात मागण्या आहेत. मुंबईतील जागेच्या बदल्यात बिहार सरकारने पाटण्यामध्ये ‘महाराष्ट्र भवन’साठी पाच एकर जागा द्यावी. आम्हालाही पाटण्यात ३० मजली महाराष्ट्र भवन उभारायचे आहे,” असे आव्हान राऊत यांनी दिले.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिहार सरकारला सुनावताना म्हटले की, जर बिहारला मुंबईत स्वतःचे भवन हवे असेल, तर त्यांनी गौतम अदानी यांच्याकडून बाजारभावाने जागा विकत घ्यावी. सरकारी जागा हवी असेल तर त्याबदल्यात पाटण्यात महाराष्ट्राला जागा मिळायला हवी. “मुंबईची सद्यस्थिती आणि समस्या समजून घ्या. उगाचच वातावरण बिघडेल असे विधान करू नका,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुंबईत याआधीच उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांची भवने आहेत. मात्र, ३० मजली बिहार भवन आणि त्याला होणारा राजकीय विरोध यामुळे हा मुद्दा आता केवळ विकासाचा न राहता अस्मितेचा बनला आहे. एकीकडे बिहार सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे, तर दुसरीकडे मनसे आणि शिवसेना (UBT) यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Mayor : भाजपकडून महापौर, उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झालेल्या आडके...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका हिमगौरी आडके (Himgauri Adke) आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळसाहेब सानप...