मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक वळण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची जनता आणि कार्यकर्ते वाट पाहत होते, तो क्षण अखेर उजाडला. ठाकरे बंधूंनी सर्व जुने मतभेद आणि राजकीय वाद बाजूला सारून आगामी निवडणुकांसाठी महायुतीची अधिकृत घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसले. त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडाडून टीका केली. “महाराष्ट्रात सध्या ज्याप्रमाणे लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय आहे, तशाच काही राजकीय टोळ्या उमेदवार पळवण्याचे काम करत आहेत,” असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. यामुळेच सावधगिरी बाळगत सध्या कोणाला किती जागा दिल्या आहेत, हे जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युतीची भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, “कुठल्याही वैयक्तिक वादापेक्षा किंवा भांडणापेक्षा आमचा महाराष्ट्र मोठा आहे. याच भावनेतून आम्ही एकत्र येण्याचा विचार सुरू केला.” त्यांनी अधिकृतपणे शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून दोन्ही पक्षांचे बळ एकवटल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी लढाईसाठी राज ठाकरेंनी मोठा निर्धार व्यक्त केला. “मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमच्या युतीचाच असेल,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी ही युती एक निर्णायक पाऊल ठरेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता ही युती प्रत्यक्ष निवडणुकीत काय जादू करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




