Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजरवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; काँग्रेस, ठाकरे गटाचा आरोप,...

रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; काँग्रेस, ठाकरे गटाचा आरोप, गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai
मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात बिग फाईट झाली होती. शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. मात्र या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी केलाय. अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर – पश्चिम मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अमोल गजानन किर्तीकर आणि शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या थेट लढत झाली होती. शेवटपर्यंत चाललेल्या मतमोजणीदरम्यान या दोघांनी एकमेकांना चांगली लढत दिली होती. अखेर ४८ मतांनी रविंद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र आता याच मतमोजणीसंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये एम. पंडिरकर आणि दिनेश गुरव यांचा समावेश आहे. यातील पंडिरकर हे रविंद्र वायकर यांचे नातेवाईक तर दिनेश निवडणुक अधिकारी असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

परवानगी नसताना वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीच्या खोलीत मोबाईलचा वापर केला होता. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्याने त्यांना मोबाईल पुरवला होता. त्यानंतर मिळालेल्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हा प्रकार उघडकीस येताच भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकर यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणुक अधिकार्‍यांविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी शहानिशा सुरु केली होती. मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध १८८, ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकारानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट सदर घडलेल्या प्रकारावर पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?
भारतातील ईव्हीएम हा एक ‘ब्लॅक बॉक्स’आहे. कोणालाही त्यांची छाननी करण्याची परवानगी नसल्याचं राहुल गांधींनी म्हटले आहे. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही फक्त दिखावा म्हणून उरते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते, असे राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी केला संताप व्यक्त
“उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दर उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण तडजोड करुन निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे. माझा अंदाज आहे की हा आणखी एक चंदिगडमधील गोंधळासारखा प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंधे टोळीला आपली लोकशाही संपवायची आहे. त्यांनी आताची घटना बदलायची आहे. हा गैरप्रकार हा त्यांच्या याच सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या