मुंबई । Mumbai
भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीकडून येथे वर्षा गायकवाड यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
१९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे महायुतीसाठी मुंबईतील सर्वात कठीण मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपने निकम यांची निवड करण्याचे ठरविले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने या जागेवरील उमेदवाची घोषणा केली नव्हती. त्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं. त्यामुळे अनेक दिवसांपासून भाजप या जागेवर कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर भाजपने प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे.