मुंबई | Mumbai
सध्या राज्यासह देशात गणेशोत्वाची धुम सुरु आहे. गणेशोत्सव अंतिम टप्प्यात असतानाच अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर एक अज्ञात मेसेज पाठवण्यात आला असून, त्यामध्ये ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. या धमकीच्या संदेशात असे म्हंटले आहे की ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, ४०० किलो आरडीएक्समुळे १ कोटी लोक मृत्युमुखी पडतील असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवरची जबाबदारी आणखी वाढली आहे.
‘लष्कर-ए-जिहादी’ दहशतवादी संघटनेचा उल्लेख
धमकीच्या मेसेजमध्ये ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, भारतात १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचाही दावा करण्यात आला असून, हे अतिरेकी मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे भासवले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर पडतात. मुंबईत उद्या ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका निघालेल्या दिसतील.
या प्रकरणाची पोलीस मुख्यालय, एटीएस (ATS), सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. सध्या हा मेसेज नेमका कोणी केला याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, गणपती विसर्जन मार्गांवर, रेल्वे स्थानकांवर आणि मॉल्समध्ये पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांकडून आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ १०० किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




