मुंबई | Mumbai
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेच्या पार्श्वभूमीवर भोजपुरी गाणी मोठ्या आवाजात वाजवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाऊबीजेच्या दिवशी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील काही स्थानकांवर उद्घोषणांसाठी असलेल्या स्पीकरवरून भोजपुरी गाणी वाजवण्यात आले. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत तक्रारी केल्या. विशेष म्हणजे, काही ठिकाणी लोकलच्या नियमित उद्घोषणा थांबवून गाणी वाजवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे शिवसेना, मनसे पक्ष आक्रमक झाले आहे.
मुंबईतील वडाळा, सानपाडा आणि आंबिवली रेल्वे स्थानकांवर सकाळी सकाळी भोजपुरी गाणी वाजवण्यात आली. याचे व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. यावर आता मराठी माणसांनी संताप व्यक्त केला आहेत. अनेक मुंबईकरांनी सोशल मीडियावर हे व्हिडीओ पोस्ट करत ‘हा महाराष्ट्र आहे बिहार?’, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत हा प्रकार तातडीने न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, रेल्वे बोर्डाच्या सूचनांनुसारच देशभरातील स्थानकांवर ही गाणी वाजवली जात असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
वडाळा येथे वाजवण्यात आलेल्ल्या गाण्यावरून ठाकरेंच्या सेनेने आक्षेप घेतला आहे. वडाळा येथील स्थानकावर वाजवण्यात आलेल्या गाण्यावरून ठाकरे सेनेच्या नगरसेवक माधुरी मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला. मनसे नेते राजू पाटील देखील यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये राजू पाटील यांनी लिहिले की,’आज महाराष्ट्रात दिवाळीतील भाऊ-बहीण या पवित्र नात्याचा सन्मान करणारा भाऊबीजेचा सण! मग महाराष्ट्रातील उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आज भाऊबीजेच्या सणाची मराठी गाणी का ऐकू येऊ नयेत?’
तसंच, ‘महाराष्ट्राच्या सण-उत्सवांना आणि संस्कृतीला प्राधान्य देण्याऐवजी छटपूजेची गाणी लावून परप्रांतीय सणांचा उत्सव साजरा करण्याची गरज काय? प्रश्न छटपूजेचा किंवा कोणत्याही समाजाच्या सणाचा विरोध करण्याचा नाही. पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सणांना आणि मराठी संस्कृतीला योग्य तो सन्मान मिळणार की नाही? १२ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारला प्रश्न विचारला जात होता — “कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?” आज हाच प्रश्न भाजपाला विचारण्याची वेळ आली आहे.’, असे राजू पाटील म्हणाले.
दोन तास उद्घोषणा बंद ठेवल्याचा आरोप
रेल्वे स्थानकांवरील ध्वनिक्षेपकांचा वापर प्रामुख्याने लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आगमन-प्रस्थान, फलाटातील बदल तसेच महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी केला जातो. मात्र, काही स्थानकांवर नियमित उद्घोषणा थांबवून सुमारे दोन तास भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांच्या मते, मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे गाड्यांच्या वेळा आणि फलाटासंबंधीच्या सूचना ऐकण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सणाच्या उत्साहाच्या नावाखाली प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण
या वादावर मध्य रेल्वे प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली. छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसारच ही गाणी वाजवली जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले की, “दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत आहेत. त्या अनुषंगाने काही स्थानकांवर प्रवाशांच्या स्वागतासाठी ही गाणी वाजवण्यात आली आहेत. हा उपक्रम केवळ मुंबई किंवा मध्य रेल्वेपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशभरात राबवला जात आहे. देशातील ज्या ज्या स्थानकांवरून छठपूजा आणि दिवाळीनिमित्त प्रवासी आपल्या गावी रवाना होत आहेत, त्या सर्व स्थानकांवर ही गाणी वाजवली जात आहेत.”




