Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी, लोकल खोळंबली

Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी, लोकल खोळंबली

मुंबई । Mumbai

राज्यात मान्सूनने अधिकृतपणे हजेरी लावल्यानंतर, सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला असून, काही तास जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

शहर आणि उपनगरांत सकाळपासून पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. भरतीच्या वेळी समुद्रात लाटा अधिक उंच उसळतील. यामुळे शहरातील पाणी निचरा प्रक्रियेवर परिणाम होतो. आधीच पडलेल्या पावसामुळे काही भाग जलमय झाले असून, भरतीमुळे स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.

YouTube video player

माटुंगा, मस्जिद बंदर यासारख्या रेल्वे स्थानकांवर पावसाचे पाणी साचले आहे. मस्जिद बंदर स्थानकात पाण्याची पातळी फलाटाच्या जवळ पोहोचली असून, तेथील लोकल वाहतूक कधीही थांबण्याची शक्यता आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरील गाड्या सध्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रचंड पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूकही कोलमडली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ते मालाडदरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच, पूर्व द्रुतगती मार्गावर आणि एलबीएस मार्गावर भांडूप, कांजूरमार्ग आणि सायन परिसरात वाहनांची रांग लागली आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी सबवे आणि कुर्ला वेस्टमध्येही तसाच परिस्थितीचा सामना नागरिक करत आहेत. कुर्ला, सायन, दादर आणि परळ या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला आहे. लोकल गाड्याही संथ गतीने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने, महानगरपालिकेने तातडीने पंपिंग स्टेशन सक्रिय केली आहेत. निचऱ्याची व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईत पावसाने नेहमीप्रमाणे सुरूवातीलाच आपल्या ताकदीचे दर्शन घडवले आहे. भरतीमुळे अडथळे आणखी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि वाहतूक पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, मात्र पावसाचा जोर असाच राहिल्यास काही ठिकाणी आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...