मुंबई | Mumbai
काँग्रेस जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाविरोधात शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा काढला. हिंदू टेरर, सनातन टेरर असे संताप जनक वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे, चव्हाण यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गट संतापला असून चांगलाच आक्रमक झाला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. शिवसैनिकांचा हा मोर्चा टिळक भवनाबाहेर पोहोचला असून त्यांना अडवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभमूवर टिळक भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
माजी खासदार राहुल शेवाळे, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे, शायना एन.सी यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांसह या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत माजी खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोटात कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू धर्माचा अपमान केला. हिंदू धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही. वारंवार काँग्रेसकडून सनातन धर्माचा अपमान करणारी विधाने केली जातात. हिंदुत्वाबाबत आम्ही हे खपवून घेणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने भगवा दहशतवाद शब्दाचा प्रयोग केला. तो कोर्टात खोटा ठरला. हिंदू दहशतवाद खोटे होते हे षडयंत्र उघड झाले असे मनीषा कायंदे यांनी म्हटले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाण्यातही युवा सेना आक्रमक झाली. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात ठाण्यातील आनंद आश्रम बाहेर आंदोलन करण्यात आले. “गर्व से कहो हम हिंदू है” असे फलक यूवा सैनिकांच्या हातात फलक झळकत होते.
तर सनातन धर्माला दहशतवादी म्हणता, त्यावर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षाने उत्तर द्यायला हवे. हिंदूंमध्ये फूट पाडता, हिंदूविरोधी विधाने करतात. हा भगवा महाराष्ट्र आहे. हिंदुत्ववादी देश आहे अशी भावना शिंदेसेनेच्या नेत्यांनी व्यक्त करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांनी टिळक भवनाच्या दिशेने मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत हा मोर्चा १०० मीटर अंतरावर अडवला. परंतु आम्हाला टिळक भवनात जाऊ द्या, आम्ही निवेदन देतो अशी भूमिका शिंदेसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली.
पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य काय ?
भाजपच्या लोकांना किंवा काँग्रेसच्या लोकांनाही माझी नम्रपणे विनंती आहे की कृपया भगवा शब्दाचा वापर करू नका. महाराष्ट्रामध्ये आमच्याकरता भगवा हा पवित्र शब्द आहे, ते स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ( भगवा) ध्वज आहे. भगवा रंग हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि वारकरी पंथाचा रंग आहे, तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कोणीही राजकीय लेबल कृपा करून देऊ नका. म्हणायचे असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा पण भगवा म्हण नका अशी माझी विनंती आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




