नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हिंदी आणि मराठी भाषा, त्रिभाषा सूत्रावरून सत्ताधारी राज्यात बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या असताना आता त्यात खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याने राज ठाकरे आणि मराठी भाषिकांना पुन्हा डिवचले आहे. मुंबई गुजरातचा भाग होती. भाषा पुनर्रचनेनंतर मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. आम्ही मराठीचा, मराठी माणसाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. पण मराठी भाषिकांचे मुंबईच्या लोकसंख्येतले प्रमाण ३१-३२ टक्केच आहे असे उत्तर प्रदेशचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.
एका मुलाखतीत हिंदी-मराठी वादावर निशिकांत दुबे यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले की, बॉम्बे महाराष्ट्राचा भाग नव्हता, तो गुजरातचा भाग होता. १९५६ मध्ये भाषिक प्रांतरचना झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. परंतु आजही मुंबईची स्थिती पाहिली तर केवळ ३१-३२ टक्केच लोक मराठी भाषिक आहेत. तितकेच ३२ टक्के हिंदी भाषिक आहेत. २ टक्के भोजपुरी, १२ टक्के गुजराती, ३ टक्के तेलगु, २ टक्के तामिळ, २ टक्के राजस्थानी, ११-१२ टक्के लोक ऊर्दू भाषिक आहेत.
राज-उध्दव ठाकरेंमुळे असे वाटते की महाराष्ट्र देशाचा भाग नाही
निशिकांत दुबे यांनी यावेळी ठाकरे बंधूंचा समाचार घेतला. ते म्हणाले‘महाराष्ट्र देशाचा अविभाज्य भाग आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे असे वाटते की महाराष्ट्र देशाचा भाग नाहीये. देशात कोणालाही कुठेही जाऊन राहण्याचा, काम करण्याचा अधिकार आहे. पूर्ण देशभरात मारवाडी समाजाचे लोक आहेत. ही मंडळी राजस्थानातून देशभर पसरली. कोणी मारवाडी समाजाच्या माणसांना पळवून लावले का? त्यांना आदर देण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे. राजस्थान, कन्नड, तामीळ, मल्याळम असो- त्या लोकांना त्यांच्या भाषेविषयी प्रेम आहे तसेच उत्तर प्रदेश, झारखंड, बिहारच्या लोकांना हिंदी भाषेविषयी ममत्व आहे. राष्ट्रभाषा हिंदी मानत नाही हरकत नाही. पण हिंदी तिथे बोलली जाते. त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी जी ब्रिटिशांची भाषा आहे ती शिकवली गेली तर तुम्हाला अडचण नाही’.
देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान आहे
निशिकांत दुबे असे ही म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान आहे ते कुणी नाकारत नाही. परंतु महाराष्ट्र जो कर देतो त्यात सर्वात जास्त योगदान आमचे आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा करदाता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्याचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे. ते जे कर देतात त्यात आमचे पैसे नाहीत का? संपूर्ण देशाचा पैसा आहे. महाराष्ट्राचे क्रेडिट डिपॉझिट १०० टक्के आहे. तामिळनाडूत ११० टक्के आहे. जे पैसे आम्ही बँकेत भरतो, ते बँक आपल्या उद्योग धंद्यासाठी पैसे देते त्याला क्रेडिट डिपॉझिट म्हणतात. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, ओडिसा यांचा क्रेडिट दर ४० टक्के आहे. जर आम्ही १०० रूपये जमा करत असू तर आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया ४० रुपये देते आणि महाराष्ट्राला ६० रुपये देते. पैसे आमचे आणि कर महाराष्ट्राच्या खात्यातून जातो असे त्यांनी सांगितले.
निवडणुका असतात तेव्हा गरीब माणसाला मारले जाते
‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे- जेव्हा जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतात तेव्हा गरीब माणसाला मारले जाते. हिंदीभाषिक लोकांना मारले जाते. प्रत्येकाला आपापल्या मातृभाषेचा अभिमान वाटतो. आमची मातृभाषा हिंदी आहे याचा अभिमान आहे. हिंदीने आम्हाला सगळे काही दिले आहे. देशभरात जिथे कुठे हिंदी भाषेवर आक्रमण होईल- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत. मी पुन्हा सांगतो, मी खासदार आहे. कायदा हातात घेत नाही. हे कधी महाराष्ट्राबाहेर जातील तिथली माणसे, ज्या कुठल्या राज्यात जातील तिथली माणसे पटक पटक के मारेंगे’, असे दुबे म्हणाले.
‘तुम्हाला एका गोष्टीची वृथा अभिमान आहे. मुंबईत फिल्म इंडस्ट्री आहे. तुम्ही ठरवा की कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण होणार नाही. कोणतेही हिंदी कलाकार नसतील असे सांगा. मराठीत चित्रपट करायचा असेल तर करा अन्यथा निघा असे सांगणार का? नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, सेबी यांचा कोणताही चेअरमन मराठी नाही. त्यांनाही राज्याबाहेर घालवायला हवे तुम्ही. सगळे कर भरतात’, असा सवाल दुबे यांनी केला.
तसेच एलआयसीमध्ये सर्वच विमाधारक आहेत, त्याचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे तर त्याचाही कर महाराष्ट्रात जातो. रिलायन्स इंडस्ट्रीचा कुठलाही उद्योग असो त्याचे पैसे महाराष्ट्रात जातात. बिहारमध्ये टाटाने कंपनी स्थापन केली. जर बिहार नसते तर टाटा कंपनी नसती. आज टाटाचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे. ते कर देतात. आदित्य बिर्ला मुख्यालय तिथे आहे ते पैसे देतात. जिंदाल कंपनी ते महाराष्ट्राला पैसे देतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या योगदानात आमचाही अधिकार आहे. तुम्ही सक्षम आहात, तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देता त्यात दुमत नाही परंतु आम्हाला दुर्लक्षित करू नका. जर तुम्हाला अमराठी लोक आवडत नसेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनसमोर दांडका घेऊन उभे राहा. एलआयसीसमोर जा, त्यांना मराठी येतच नाही. त्यांना मारहाण करा.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




