ठाणे | Thane
मुंबई महापालिका निवडणुकांसहित राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ओवैसी यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात एकूण १२६ उमेदवार जिंकले आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मुंब्रा येथील नगरसेविकेच्या एका वाक्याने खळबळ उडाली आहे.
ठाण्यात एमआयएमचे पाच नगरसेवक विजयी झाले असून या पाच नगरसेवकांपैकी प्रभाग क्रमांक ३० मधून तरुण नगरसेविका म्हणून सहर शेख विजयी झाल्या आहेत. सहर शेख यांच्या विजयाचा जल्लोषही मुंब्र्यात करण्यात आला. पण, या विजयाच्या जल्लोषावेळी केलेल्या भाषणात सहर शेख यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरणासोबतच सामाजिक वातावरणही चांगलेच तापले आहे.
सहर शेख काय म्हणाल्या?
मुंब्रामध्ये AIMIM पक्षाकडून जिंकल्यानंतर नगरसेविका सहर युनूस शेख यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे. ‘मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू. पुढील महापालिका निवडणुकीत एमआयएमचे नगरसेवक निवडून येतील, असे त्यांनी म्हटले. ” प्रभाग क्रमांक 30 मध्ये सगळ्यांनी भरभरुन मतदान करुन एमआयएमच्या उमेदवारांना विजयी केले. पण पाच वर्षांनी याठिकाणी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठे प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे. या लोकांना इथून पळून जायला लागले पाहिजे. पाच वर्षांनी मुंब्रा परिसरात सगळे एमआयएमचे उमेदवार निवडून येतील, ही मजलिसची ताकद आहे. ही ताकद आपल्याला अल्लाहने दिली आहे.” असे सहर शेख यांनी म्हटले. पण पाच वर्षांनंतर संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने रंगवायचा आहे, या सहर शेख यांच्या विधानामुळे नवा वाद पेटला असून यामुळे अनेकांनी संतप्त व्यक्त केला आहे.
तामिळनाडूत राजकारण तापलं; राज्यपालांचा अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय, नेमकं काय घडलं?
युनुस शेख यांची जितेंद्र आव्हाडांवर टिका
युनुस शेख यांनी आक्रमक भाषेत जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करताना म्हटले की, जितेंद्र आव्हाडला मी जीजी नाव ठेवले आणि तो महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. अल्लाहतालाने माझ्या मुलीला ‘हिजाबवाली बेटी’ म्हणून लोकप्रिय केले. जितेंद्र आव्हाड यांनी इथून पुढे कोणत्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नये. नाहीतर आमचा समजा एकत्र येऊन विकेट कशी पाडतो, हे बघितलं ना. तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, मी आता माझ्या मुलीला एमआयएममधून निवडून आणले आहे. जर प्रभाग क्रमांक ३० मध्ये कुठलाही अडथळा निर्माण केला तर इथून काय-काय निघणार, याचा तू विचार सुद्धा करु शकत नाहीस.
यंदाच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनूस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळे सहर शेख या एमआयएमकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनूस शेख आणि सहर शेख या बाप – लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली.




