Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ‘अ‍ॅक्शन मोड’वर

Ahilyanagar : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ‘अ‍ॅक्शन मोड’वर

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, नाकाबंदी व गस्तीला वेग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अहिल्यानगर शहर पोलीस दल ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले आहे. निवडणूक काळात शहरातील शांतता अबाधित राखणे, कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे आणि निवडणूक प्रक्रिया निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे, ही मोठी जबाबदारी शहर पोलिसांवर येऊन ठेपली आहे.

- Advertisement -

निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली असून, त्यानुषंगाने प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, त्यांना नोटिसा बजावणे, परवानाधारक व्यक्तींकडील शस्त्रे जमा करणे, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी उभारणे तसेच नियमित गस्त वाढविण्याच्या स्पष्ट सूचना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी मंगळवारी (16 डिसेंबर) शहरातील तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदारांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भांबळ, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्यासह तिन्ही ठाण्यांच्या गोपनीय शाखेतील पोलीस अंमलदार उपस्थित होते.

YouTube video player

या बैठकीत निवडणूक काळात उद्भवू शकणार्‍या संभाव्य तणावाच्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. दोन समाजगटांमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, भांडणे किंवा आक्षेपार्ह प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात शांतता राखण्यासाठी गस्तीचे प्रमाण वाढविण्याचे, संवेदनशील ठिकाणी नाकाबंदी उभारण्याचे तसेच संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक काळात घडणारी एखादी छोटी घटना देखील मोठे पडसाद उमटवू शकते, याची जाणीव ठेवून पोलीस सर्तक झाले आहेत. दरम्यान, जिल्हा विशेष शाखेने मागील निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची माहिती अहिल्यानगर शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यांकडून मागवली असून, त्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.

‘त्रासदायक’ गुन्हेगारांवर लक्ष
मागील महानगरपालिका निवडणुकीच्या काळात गुन्हे दाखल झालेल्या तसेच यंदाच्या निवडणुकीत शांततेस धोका ठरू शकणार्‍या गुन्हेगारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता कलम 168 नुसार प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात येणार असून, काही सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याचीही तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

महिनाभर पोलिसांची कसोटी
एकंदरीत आगामी महिनाभर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडणे आणि कोणत्याही अनुचित घटनेला आळा घालणे, हे आव्हान अहिल्यानगर शहर पोलिसांसमोर आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या समन्वयातून शांततापूर्ण निवडणूक पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...