अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात चार पालिका वगळता अन्य आठ पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी (दि. 2) मतदान होत आहे. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये फुट पडली असून महायुती व महाआघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. सर्वाधिक पालिकांच्या निवडणुका भाजप लढत असून महायुतीमध्ये कोण ठरणार पहिल्या क्रमांकाचा पक्ष हे बुधवारी निकालानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांसह सहा आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून गेल्या काही दिवसांपासून त्या त्या ठिकाणच्या आमदारांनी पालिका क्षेत्र पिंजून काढून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे.
जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व एका नगर पंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर झाला होता. या निवडणुकीत 12 नगराध्यक्षपदासाठी 86 तर 289 नगरसेवकपदांसाठी 1 हजार 274 उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांशी ठिकाणी रंगतदार लढती होत आहे. नगराध्यक्षांची थेट निवडणूक असल्याने राजकीय वातावरण तापलेले असून प्रत्येक पक्षाने संबंधित पालिकेचा मतदार पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगर जिल्ह्यातील प्रत्येक पालिका हद्दीत वेगवेगळी राजकीय समीकरणे असल्याने या ठिकाणी कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शनिवारी अचानक निवडणूक आयोगाने कोपरगाव, देवळाली, पाथर्डी व नेवासा या चार पालिकांसह सात पालिकांमधील 12 प्रभागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे आज मंगळवारी आठ नगराध्यक्ष व 277 नगरसेवकपदासाठी मतदान होत आहे. यात महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमधील तीन पक्षांमध्ये समोरासमोर लढत होते. त्यामुळे महायुतीत कोणता पक्ष सर्वश्रेष्ठ ठरले हे निकालानंतर स्पष्ट होईल. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा या सहा पालिकांमध्ये महायुतीत अंतर्गत मतभेद आणि पक्षातील गटबाजी स्पष्ट दिसत आहेत. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर असल्याने मतविभाजनाचा फटका महायुतीवर पडण्याची शक्यता आहे. राहाता व शिर्डी या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महायुती एकत्रित केली आहे.
संगमनेरमध्ये आमदारकीची पहिलीच टर्म असलेले आमदार अमोल खताळ यांना माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट देखील स्वबळावर लढत असल्याने आ. खताळ यांची कोंडी झाली आहे. या ठिकाणी आ. खताळ यांच्या प्रतिष्ठेची व आ. तांबे यांच्या अस्तित्वाची ही लढत आहे. अर्थात पालकमंत्री विखे जातीने लक्ष देत असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. श्रीरामपूरमध्ये पहिल्यांदा आमदार झालेले आ. हेमंत ओगले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आ. ओगले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला समोरे जात आहे. त्यांच्या विरोधात भाजप व शिवसेना शिंदे गट असे दोन पक्ष समोर आहेत.
अर्थात या ठिकाणी पालकमंत्री विखे हे जातीचे लक्ष देत आहे. अर्थात श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. राहुरी पालिका निवडणुकीत भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी अशी लढत होत आहे. आ. शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या निवडणुकीची जबाबदार पालकमंत्री विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कै. कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या खांद्यावर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक आघाडी केली आहे. सहाजिकच या ठिकाणी निवडणूक ही पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची ठरली आहे.
शेवगाव पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना हे महायुतीचे तिन्ही पक्ष समोरासमोर उभे आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाही नशीब अजमावत आहे. आमदार मोनिका राजळे यांनी उमेदवार निश्चितीपासून निवडणूक हाती घेतली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व माजी आमदार चंद्रशेखर घुले करीत आहेत. जामखेडमध्ये विधान परिषदेचे सभापती आ. राम शिंदे व आमदार रोहित पवार या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आ. शिंदे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या निवडणुकीत निर्माण झाला आहे. विधानसभेत झालेला पराभवाचा वचपा या निवडणुकीत त्यांना काढता आला नाही, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तर आ.पवार यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. महायुती व महाविकास आघाडी या निवडणुकीत न झाल्याने युती व आघाडी अंतर्गत जोरदार संघर्ष प्रा. शिंदे व आ. पवार यांना करावा लागत आहे.
श्रीगोंदा पालिकेत देखील पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आ. विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणूक होत आहे. त्यामुळे याचा या निवडणुकीत चांगलाच कस लागला आहे. या ठिकाणी महायुतीमधील तिन्ही पक्ष आमनेसामने उभे आहेत. तर महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढत आहे. पालकमंत्री व भाजपचे निवडणूक प्रभारी राधाकृष्ण विखे यांनी या पालिका निवडणुकीत संपूर्ण किल्ला लढविला आहे. शिर्डी मतदार संघातील राहाता व शिर्डी या दोन पालिकांच्या निवडणुकीसह जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेऊन सर्वांना मदत केली. विशेष म्हणजे मंत्री विखे यांनी भाजपसह मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पाठबळ दिले आहे. संगमनेर व नेवासा या दोन्ही पालिकांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना मदत करीत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची चाचपणी
जिल्ह्यातील पालिका निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपआपल्या हद्दीतील राजकीय ताकद आजमावतांना दिसत आहे. या निवडणुकीचे कार्यक्षेत्र तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शहराचे असले तरी निवडणुकीच्या निमित्ताने लवकरच होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची चाचपणी यातून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. यामुळे ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची ठरणार आहे.




