अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या पहिला दिवस निरंक गेला. सोमवार (दि.10) पासून सोमवार (दि.17) पर्यंत उमेदवारी दाखल करण्यासाठी मुदत आहे. दरम्यान, आता उमेदवारांना ऑनलाईन उपलब्ध असल्याने कोणत्या पालिकेतून कोणी किती अर्ज नेले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. यंदा केवळ दाखल अर्जाची माहिती उपलब्ध होणार असल्याचे पालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
यंदा पालिका निवडणुकीसाठी निवडणूक लढविणार्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 11 नगर परिषद व 1 नगर पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी संबंधित अधिनियमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेश व सूचनांनुसार उमेदवारांनी कार्य करणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्यात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रमाणीकरण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफ. एम. वाहिन्या, चित्रपटगृहे, बल्क एस.एम.एस., व्हॉइस एस.एम.एस., संकेतस्थळे आदींचा समावेश होतो. समाजमाध्यमे (सोशल मीडिया) यात इंटरनेटद्वारे वापरली जाणारी संवादाची व माहितीची व्यासपीठे समाविष्ट होतात, ज्याद्वारे लोक एकमेकांशी संवाद साधतात, माहिती शेअर करतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात, मते किंवा विचार मांडतात आणि विविध प्रकारची माहिती (फोटो, व्हिडिओ, लेख, बातम्या) इतरांपर्यंत पोहोचवतात. उदा. एक्स (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक, लिंक्डइन, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म्स, मायक्रो ब्लॉगिंग साइट्स, मेसेजिंग प्स (व्हॉटसप, टेलिग्राम) तसेच कोलॅबोरेटिव्ह टूल्स (विकी, डिस्कशन फोरम्स) इत्यादींचा समावेश होतो.
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. या समितीत पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसीलदार अथवा नगरपरिषद/नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. निवडणूक लढविणार्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणीकरण करून घेण्यासाठी त्या जाहिराती जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी रोड, अहिल्यानगर) यांच्याकडे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले आहे.
केवळ जामखेडमध्ये एक परवानगी
जिल्ह्यात पालिका निवडणुकीसाठी सभा, वाहन, फ्लेक्स बोर्ड आणि अन्य प्रयोजनासाठी परवानगीची आवश्यक आहे. यात पहिल्या दिवशी जामखेड पालिका निवडणुकीसाठी अन्य प्रयोजनासाठी एक परवानगी देण्यात आलेली आहे. उर्वरित 11 ठिकाणी एकाही उमेदवार अथवा पक्षाकडून कोणत्याही कारणासाठी परवानगीसाठी अर्ज केलेला नाही.




