अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील सुयोग पार्क, नगर-कल्याण रस्ता परिसरात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील दोन उमेदवारांच्या गटांत मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र हाणामारी झाली. धारदार शस्त्रे, कोयते, चाकू, लाकडी दांडके व लोखंडी गजांचा वापर करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत महिला व युवकांसह दोन्ही गटाचे एकूण पाच जण जखमी झाले असून पोलिसांनी रात्रीतून धरपकड करत एका गटाच्या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, दोन्ही गटांतील सुमारे 25 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री 12.10 वाजता त्यांचा मुलगा डीपी चौक परिसरात उभा असताना एका कार चालकाने अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलगा कसातरी बचावून पळून गेला, मात्र कारने त्याचा पाठलाग सुरू ठेवला. त्या कारमध्ये हिरा जाधव असल्याचे फिर्यादीच्या भाच्याने पाहिले. दरम्यान, हिरा जाधव याने धमकी देत, ‘आज वाचलास, पुढे सांभाळून’ असे म्हणत तेथून निघून गेला. काही वेळातच अक्षय गाडळकर व अन्य इसम लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आले. वाद वाढत असताना मोठ्या टोळक्याने सुयोग पार्कच्या मोकळ्या मैदानात एकत्र येत हल्ला चढवला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आदेश जाधव याने चाकूने फिर्यादीच्या बाजूच्या एकावर, तर राज जाधव याने दुसर्यावर धारदार शस्त्राने वार केला. भांडण सोडविण्यास गेलेल्या फिर्यादीच्या वहिनीला मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांचा विनयभंग झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच आणखी एकाला हल्ल्यात दुखापत झाली.
याप्रकरणी पोलिसांनी हिरा जाधव, आदेश जाधव, राज जाधव, नीलेश गाडळकर, मनोज गाडळकर, चिकु ऊर्फ श्रीकांत सरोदे, अभिजित दळवी, अक्षय गाडळकर, ऋषीकेश घुले व इतर पाच ते सात अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसर्या गटाचे अभिषेक शंकर दळवी (रा. काटवन खंडोबा रस्ता) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दळवी यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे 12.45 वाजताच्या सुमारास सुयोग पार्क परिसरात तीन दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने त्यांना व त्यांच्या मित्राला अडवले. या टोळक्यातील काही जणांच्या हातात कोयता, लाकडी दांडके व लोखंडी गज होते. ‘आमच्या वॉर्डात येऊ नका, विरोधात गेलात तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत मारहाण करण्यात आली. यावेळी एकाने कोयत्याने पोटावर वार केल्याचा आरोप अभिषेक दळवी यांनी केला आहे. हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.
परिसरात दहशत, चौघे अटकेत
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच शहरातील कोतवाली, तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. हाणामारीनंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. यामध्ये हेमंत ऊर्फ हिरा बाबासाहेब जाधव, आदेश सुरेश जाधव, अक्षय अरूण गाडीळकर व ऋषीकेश नितीन घुले यांचा समावेश आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर घडलेल्या या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.




