Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकांची घोषणा

पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकांची घोषणा

महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

YouTube video player

प्रभाग रचना, इतर मागासवर्गाचे आरक्षण तसेच अन्य मुद्द्यांवरून गेली अनेक वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरु झाले असून राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील, असे सूत्रांनी सांगितले.

नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदत कार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तर मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारीच्या २०२६ आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस अगोदर पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेला हजर राहणार आहेत. त्यामुळे २० जानेवारीपूर्वी महापालिका निवडणुका होतील, असेही सांगण्यात आले.

मतदान यंत्रासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार
दरम्यान, राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) कमी पडू नयेत, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मशीन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५० हजार ईव्हीएम खरेदी केली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाकडे सुद्धा ईव्हीएमची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी दुसऱ्या दिवशी हाती घेतली जाईल. कारण तिन्ही टप्प्यातील निवडणुकीची एकत्र मतमोजणी शक्य नाही. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादीत मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी होईल, असे सूत्रांनी सांगितले.

निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था
महापालिका………………… २९
नगरपालिका………………… २४६
नगरपंचायती…………………. ४२
जिल्हा परिषद…………………. ३२
पंचायत समिती…………………….. ३३६

ताज्या बातम्या