अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दुबार मतदारांवरून बिहारनंतर महाराष्ट्रात रणकंदन माजले असताना, नगर जिल्ह्यातील 11 नगर पालिका, 1 नगर पंचायतीत 152 प्रभागात 4 लाख 51 हजार 262 मतदार असून यात तब्बल 6 हजार 518 मतदारांची नावे संभाव्य दुबार यादीत आली आहेत. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या यादीत अवघी 1 हजार 500 असे 8 हजारांंहून अधिक नावे मतदार यादीत दुबार असल्याचे आढळली आहेत. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना या मतदारांची यादी पाठवण्यात आली असून बीएलओंमार्फत तातडीने त्याची पडताळणी करण्यास सांगितले आहे.
जिल्ह्यात 12 नगरपंचायतींच्या स्थानिक पातळीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली असली, तरी नगरपालिका, विभागाला मतदार यादीतील दुबार नावांचा ताण आहे. आयोगाने सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची पडताळणी करून एकाच मतदारसंघात, एकच प्रभाग आणि एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा राबविली जात आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये चुरस जास्त असते, मतदारांची संख्या कमी असते त्यामुळे एक-एक मत महत्त्वाचे असते. पोलिंग एजंट डोळ्यात तेल घालून असतात.
एकजरी दुबार मतदार आढळला किंवा एकाने अन्य ठिकाणीदेखील मतदान केले, तर लगेच त्यावर आक्षेप घेतला जातो. त्यामुळे या निवडणुकांमध्ये दुबार मतदारांची संख्या कमी असते. यामुळे निवडणूकांपूर्वीच दुबार नावे असलेली मतदारयादी त्यात्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील, एका प्रभागातील एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे.
त्यानुसार तसा अर्ज भरून घेतला जाईल. अन्य ठिकाणी त्यांचे नाव असेल तर त्यापुढे स्टारचे चिन्ह असेल. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकार्यांना हा दुबार मतदार असल्याचे लक्षात येईल. पालिका व झेडपी, पंचायत समित्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. यात पालिकांची निवडणूक 20 दिवसांत असल्याने एवढ्या कमी वेळेत दुबार मतदारांचे नाव यादीतून वगळता येणार नाहीत. फक्त नावापुढे दुबारचे चिन्ह असेल. निवडणूक झाली की ही नावे यादीतून वगळली जातील.
पालिकानिहाय दुबार मतदार
श्रीरामपूर 1 हजार 635, संगमनेर 1 हजार 303, कोपरगाव 817, राहुरी 258, देवळाली प्रवरा 175, राहाता 131, पाथर्डी 260, श्रीगोंदा 280, शेवगावइ 377, जामखेड, 557, शिर्डी 563 आणि नेवासा 162 एकूण 6 हजार 518 पालिकांमध्ये आहेत. तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये 1 हजार 500 दुबार मतदार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.





