पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील कडगाव शिवारात शेतातील चाळीत झोपलेल्या शेतकर्याची कापसाच्या गोण्यांच्या चोरीदरम्यान निर्घृण हत्या करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.
दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री रामदास कारभारी शिरसाठ (वय 55, रा. कडगाव शिवार, ता. पाथर्डी) हे आपल्या शेतातील कांद्याच्या चाळीतील पत्र्याच्या शेडमध्ये कापसाच्या गोण्यांची राखण करण्यासाठी झोपलेले होते. याच दरम्यान भाऊसाहेब अशोक निकम, अशोक संजय गिते, श्रीकांत रावसाहेब सूर्यवंशी व करण अजिनाथ कोरडे या चौघांनी कट रचून शेडमधील सुमारे 15 हजार रुपये किमतीच्या 14 कापसाच्या गोण्या चोरी केल्या व त्या जवळच असलेल्या उसाच्या शेतात लपवून ठेवल्या.
चोरी करत असताना रामदास शिरसाठ यांना जाग आली व त्यांनी आरोपींना ओळखले. यामुळे आरोपींनी शिरसाठ यांच्या तोंडावर रग व कापूस दाबून जिवे ठार मारले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र चौथा आरोपी करन अजिनाथ कोरडे (रा. मिरी शिवार, ता. पाथर्डी) हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता.




