अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या व्यक्तीचा खून करणार्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी दोषी धरून जन्मठेप व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. रोहन राजेंद्र वडागळे (वय 24 रा. भिस्तबाग) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने अमोल मुरलीधर थोरात यांचा पोटात व काखेत कैचीच्या पात्याने वार करून खून केला होता. 31 मे 2020 रोजी सायंकाळी रोहन वडागळे व इतरांचे सावेडीतील भिस्तबाग येथे वाद सुरू होते. त्यावेळी तेथील एका फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे अमोल उर्फ चिवड्या मुरलीधर थोरात हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेले असता त्यांचा धक्का आरोपी रोहन वडागळे याच्या वडिलांना लागला व ते खाली पडले.
त्यामुळे आरोपी रोहन यास राग आल्याने त्याने कैचीचे पाते काढून अमोल थोरात यांच्या पोटावर तसेच काखेत वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी विवेक मुरलीधर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द भादंवि कलम 302 व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपासी अधिकार्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश सहारे यांनी सरकारी पक्षाने सादर केलेला एकंदरित पुरावा तसेच परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून आरोपी रोहन वडागळे यास दोषी धरून शिक्षा ठोठावली. उर्वरीत तीन आरोपीविरूध्द पुरेसा पुरावा नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता आर. एल. कोळेकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी व्ही. व्ही. साठे व श्रीमती बोर्डे यांनी सहकार्य केले.