धुळे । Dhule। प्रतिनिधी
शहरात काल सकाळी झालेल्या हमाल (Hamal) विजयकुमार याच्या खुनाचा (murder) स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने चोवीस तासांच्या आत छडा लावला. मयतासोबत हमाली करणाराच आरोपी (accused) निघाला असून त्याला पनवेलहून अटक करण्यात आली. त्याने उसनवारीच्या पैशातून विजयकुमार यास हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर अनैसर्गिक कृत्य करीत पुन्हा झाडाच्या फांदीने बेदम मारहाण करीत त्याचा खून केला.
विजयकुमार झिन्नत गौतम (रा मसिजिदिया पिंपरी, सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश, ह.मु.भंगार बाजार, चाळीसगाव रोड, धुळे) हा भंगार बाजार येथे हमाली करीत होता. त्याचा दि.1 रोजी रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने हत्याराने वार करुन खुन केला. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपा शेजारील सार्वजनिक शौचालयाच्या मागे त्याचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. याबाबत मयताचा शालक बुध्दराम बिपत गौतम यांच्या तक्रारीवरुन धुळे शहर पोलिसात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडुन सुरु असतांना हा गुन्हा राहुल अवधराम हरजन (गौतम) (रा. भंगार बाजार, धुळे) याने केला असुन तो कळंबोली, पनवेल येथे पळुन गेलेला असल्याची गोपनिय माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथकाला कळंबोली, पनवेल येथे रवाना केले. पथक दि. 3 रोजी त्यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव राहुल अवधराम हरजन (गौतम) (वय 20 मुळ रा. गोलहौरा, महथा, सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश व ह.मु भंगार बाजार, चाळीसगाव रोड, धुळे) असे सांगितले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
असा केला खून-
मयत विजयकुमार तसेच आरोपी राहुल हा भंगार बाजारात हमालीचे काम करत होता. दि.1 रोजी 11 वाजेच्या सुमारास आरोपी राहुल व मयत विजयकुमार हे दोघे अमळनेर येथे वेश्या बाजारात गेले होते. सायंकाळी अमळनेर येथुन ते धुळे येथे आल्यावर मयत विजयकुमार याने आरोपी राहुल यास श्रीराम पेट्रोल पंपाजवळील पाण्याच्या टाकीजवळ बोलविले होते. त्या ठिकाणी मयत विजयकुमार व आरोपी राहुल यांच्यात उधारीच्या पैश्यावरुन वाद झाला. आरोपी राहुल याने मयत विजय यास प्रथम हाताबुक्याने मारहाण करुन त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करुन त्याच्या जवळील पैसे काढुन घेत असतांना मयत विजय याने प्रतिकार केल्याने आरोपी राहुल याने घटनास्थळावरील झाडाची फांदी तोडुन मयत विजय यास डोक्यावर व शरीरावर इतर ठिकाणी मारहाण करुन त्यास जिवे ठार मारले. त्याचा मोबाईल व रोख रक्कम हिसकावुन पळुन गेल्याचे कबुल केले आहे.
या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोसई योगेश राऊत, असई संजय पाटील, असई दिलीप खोंडे, पोहेकॉ श्रीकांत पाटील, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, पोना राहुल सानप, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, मयुर पाटील, तुषार पारधी, अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.