नवीन नाशिक| प्रतिनिधी
ऐन होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी जुन्या भांडणाची कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुभम पार्क येथील सेट जोसेफ चर्च समोर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुमित सुरेश देवरे (२२) याचे त्याचा मित्र अरुण वैरागड याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. सुमित हा डीवायइन कॉलेज, सटाणा येथे शिक्षण घेत होता. तो होळी सणाच्या निमित्ताने नाशिकला आला होता. अशातच आज (दि.१३) रात्रीच्या दरम्यान तो शुभम पार्क येथील सेंट जोसेफ चर्च समोर आला असता अरुण वैरागड व त्याचे तीन ते चार साथीदार हे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले व त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून सुमितवर धारदार शस्त्राने वार केले.
या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जखमी सुमितला पोलीस वाहनातूनच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
यावेळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती. यावेळी पोलिसातर्फे तत्काळ फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाला देखील पाचरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले असल्याने पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू होता. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.