Tuesday, May 21, 2024
Homeधुळेदोंडाईचात सुरतच्या मिरची व्यापार्‍यावर खुनी हल्ला

दोंडाईचात सुरतच्या मिरची व्यापार्‍यावर खुनी हल्ला

दोंडाईचा । Dondicha । श.प्र

शहरातील नंदुरबार चौफुलीवर सुरत येथील मिरची व्यापार्‍याला दोघांनी पिस्टलचा धाक दाखवित चाकुने जिवघेणा हल्ला केला. व्याजाने घेतलेले अडीच लाख व त्याचे व्याजाचे पैसे दिले नाही, म्हणून एकाने या व्यापार्‍याचा गेम करण्याची सुपारी दिली होती. याप्रकरणी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासाच एकाला अटक केली असून त्याच्याकडून पिस्टल व तीन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

- Advertisement -

याबाबत मिरची व्यापारी मेहुल पंकजभाई मेसुरीया (वय 28 रा. बी/64 विरामनगर, अखंड आनंद स्कूलच्या बाजुला, सुरत, गुजरात) यांनी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांनी अभिषेक गोस्वामी (वय 28 रा. बेसुरोड, सुरत) याच्याकडून व्याजाने घेतलेले अडीच लाख रूपये व त्याचे व्याजाचे पैसे अडचणीमुळे परत केले नाही. म्हणून त्याने समाधान राजपुत (रा. दोंडाईचा) व सिध्दार्थ उर्फ सिध्दु थोरात (रा.नवसारी) या दोघांना पैसे वसुलीसाठी मेहुल यास जिवे ठार मारण्याची सुपारी दिली. त्यानुसार दोघांनी व्यापारी मेहुल मेसुरीया हे दि. 23 रोजी रात्री 11 वाजता दोंडाईचा येथे आलेले असतात त्यांना नंदुरबार चौफुलीवर गाठले. तेथे पिस्टल पाठीला लावून जिवे मारण्याची धमकी देत उड्डाण पुलाखाली रस्त्यावर नेले.

तेथे दोघांनी अभिषेककडून घेतलेल्या पैशाची मागणी केली. नकार दिल्याचा राग येवून एक जण पिस्टमध्ये गोळी भरू लागला. तेव्हा व्यापारी मेहुन यांनी त्यास धक्का दिल्याने पिस्टल खाली पडली. त्यानंतर एकाने व्यापारी मेहुल यांना मागून पकडून ठेवले. तर दुसर्‍याने चाकुने वार करीत जखमी केले. त्यानंतर रस्त्यावरून एक जण येतांना दिसल्याने दोघे पसार झाले. त्यावरून वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपासाची चक्रे गतीमान केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील एएसआय राजन दुसाणे, पोकाँ पुरूषोत्तम पवार, अनिल धनगर, प्रविण निकुंबे यांच्या पथकाने गोपनीय माहितीनुसार समाधान राजपुत यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्टल व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील इतर दोघां संशयीत आरोपींचाही कसुन शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या