Friday, May 31, 2024
Homeनगरमुठेवाडगावच्या महिला उपसरपंच व एक सदस्य अपात्र

मुठेवाडगावच्या महिला उपसरपंच व एक सदस्य अपात्र

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव ग्रामपंचायत निवडणूक मागील वर्षात चुरशीने पार पडल्यानंतर सत्ताधारी गटासह विरोधी गटानेही एकमेकांच्या सदस्यांचे अतिक्रमण मुद्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तीन तक्रारी केल्या होत्या. हे तीनही अर्ज निकाली काढण्यात येऊन आ.लहू कानडे गटाच्या महिला उपसरपंच व एका सदस्यास अपात्र ठरविण्यात येऊन विरोधी विखे-मुरकुटे गटाच्या सदस्याचे सदस्यत्व अबाधित राहिले असून सत्ताधारी सरपंच गट मात्र अल्पमतात आला आहे.

- Advertisement -

मुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी निवडणूक 17 जानेवारी 2021 रोजी पार पडली. या निवडणुकीत बाजार समिती संचालक विश्वनाथ मुठे यांच्या नेतृत्वाखालील, आ.लहू कानडे गट विरूद्ध विखे-मुरकुटे गटात चुरशीची लढत होऊन, सत्ताधारी गटास 5 तर विखे मुरकुटे गटास 4 जागा मिळाल्या.

विश्वनाथ मुठे यांच्या ताब्यात पुन्हा ग्रामपंचायतीची सता येऊन सागर मुठे यांची सरपंचपदी निवड होऊन कामकाज जोमाने सुरू झाले. मात्र चुरशीच्या निवडणुकीत पराभवाचे शल्य एकमेकांच्या मनातून थांबले नव्हते. प्रथम माजी सरपंच विश्वनाथ मुठे यांनी विरोधी गटाच्या सदस्या सौ. लंकाबाई दिनकर मुठे यांच्याविरूद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात अपात्र ठरविण्यासाठी तक्रार दाखल केली. समोरच्याने एक तक्रार दाखल केली म्हणून शांत न बसता विरोधी गटानेही सुरेश दिनकर रूपटक्के यांच्या नावाने सदस्य गोरख सजन जाधव यांच्याविरूद्ध अतिक्रमणाबाबत तर दुसरी तक्रार शिवाजी लक्ष्मण मुठे यांनी सदस्या सौ. उज्वला आदिनाथ दिघे यांच्याविरुद्धही अतिक्रमणाबाबत अशा दोन तक्रारी दाखल केल्या.

यावर वर्षभर चौकशी होऊन पहिल्या सत्ताधारी गटाने केलेल्या तक्रारी अर्जात सौ. लंकाबाई दिनकर मुठे यांच्या कुटुंबियांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी थकबाकी भरली असल्याने त्यांच्या विरूद्धचा अर्ज रद्दबातल ठरवून सदस्यत्व अबाधित ठेवले. विखे-मुरकुटे गटाने केलेल्या तक्रारीत उपसरपंच, सदस्या सौ. उज्वला आदिनाथ दिघे या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण जागेवर रहात असल्याचा, अन् दुसरे सदस्य गोरख सजन जाधव हे गायरान जमिनीत अतिक्रमण करून रहात असल्याचा स्पॉट पंचनामा अहवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी सादर केल्याने या दोघांचेही सदस्यत्व जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अपात्र ठरविले आहे.

सत्ताधारी गटाची सदस्य संख्या पाचवरून तीनवर आल्याने मोठा धक्का बसला आहे. तर तीनही तक्रारींचा निकाल विखे -मुरकुटे गटाच्या बाजूने लागून चार सदस्यसंख्या जशीच्या तशी राहिल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या