94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या नाशिकनगरीत भरणार असे ज्यावेळी समजले तेव्हापासूनच आपण पूर्णवेळ या संमेलनात सहभागी व्हायचे हे मनाशी पक्के ठरवून टाकले होते. वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम करण्यासाठी फॉर्म भरून दिला आणि मी देखील या साहित्याच्या वारीतली एक वारकरी बनले. 2005 साली नाशिकला झालेल्या संमेलनात आपण फारसा सहभाग घेऊ शकलो नाही याची खंत होतीच.
सौ तनुजा मुळे (मानकर)
शिक्षिका
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या नाशिकनगरीत भरणार असे ज्यावेळी समजले तेव्हापासूनच आपण पूर्णवेळ या संमेलनात सहभागी व्हायचे हे मनाशी पक्के ठरवून टाकले होते. वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम करण्यासाठी फॉर्म भरून दिला आणि मी देखील या साहित्याच्या वारीतली एक वारकरी बनले. 2005 साली नाशिकला झालेल्या संमेलनात आपण फारसा सहभाग घेऊ शकलो नाही याची खंत होतीच.
पण अचानक पुन्हा उसळलेल्या करोनाच्या दुसर्या लाटेने सगळ्यावरच पाणी फिरवले. पण कालांतराने ‘लेट बट थेट’ या न्यायाने हा सारस्वतांच्या सोहळा एकदम झक्कास झाला.
‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ,
उतरली तारकादळे जणू नगरात !!’
या कुसुमाग्रजांच्याच काव्यपंक्तीप्रमाणे कुसुमाग्रजनगरीत प्रवेश करताच आपण एका दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत याची ग्वाही पटली. मेट कॉलेजच्या स्वयंसेवकांनी या कुसुमाग्रजनगरीचा कोपरान्कोपरा देखणा करून टाकला होता. या संमेलनात तब्बल तीनशे नवीन पुस्तकांचे प्रकाशन झाले, यात माझ्यासारख्या नवोदित लेखकाचा देखील कवितासंग्रह होता याचा अभिमान वाटतो. कविकट्टा आणि गझलकट्टा तर अभूतपूर्व रंगला. निमंत्रितांच्या कविसंमेलनाने बहार आणली. पण त्याला प्रेक्षकांचा लाभलेला अल्प प्रतिसाद मनाला खटकला.कलादालन विभागातून झालेले नाशिकदर्शन खूपच भावले. आणि अभिजात मराठी दालनाची संकल्पना मनाला स्पर्शून गेली.
बालकुमार मेळावा हे यावर्षीचे वैशिष्ट्य. या मेळाव्यातला बालक आणि पालकांचा सहभाग पाहून आजही मराठी माणूस मराठी भाषेवर प्रेम करतो आणि आपल्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी धडपडतो, याची खात्री पटली. मग एक शिक्षक म्हणून आपण कुठे कमी पडतो का? याचा पण विचार मनात येऊन गेला.संमेलनातील चर्चा, परिसंवाद व त्यांचे विषय हे सर्व विचार करण्याजोगे होते. परंतु चर्चा आणि परिसंवादांना श्रोत्यांची लाभलेली उपस्थिती खरोखरच विचार करायला लावणारी आहे. सरतेशेवटी या संमेलनात उठलेल्या पंगती. सगळ्यांसाठी अन्नछत्र सुरू होते. परंतु त्याचबरोबर अन्न वाया न घालवण्याचा आयोजकांचा आग्रह हा सर्वात जास्त दिलासादायक होता.
संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना प्रत्यक्ष भेटता आले असते तर दुधात साखर पडली असती. परंतु असो, यानिमित्ताने पुन्हा एकदा साहित्य आणि राजकारण या विषयावर चर्चा घडल्या. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे वय याचाही पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली.
या संमेलनात वर्षभरापासून मला सहभागी होता आले. एक समिती सदस्य म्हणून मिरवताना एक वेगळाच आत्मविश्वास वाटत होता. या साहित्य गंगेत आपल्याही नावाचे दोन थेंब आहेत याचा खूप खूप आनंद झाला.
या संमेलनाने मराठी भाषेवर प्रेम करणार्या प्रत्येकालाच खूप खूप आनंद दिला. या संमेलनातून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेला पत्रप्रपंच फारच आवडला, पण त्याबरोबरच अजूनही हा दर्जा मिळत नाही याची खंत देखील वाटली. या संमेलनाचे फलित काय? यावर विचारवंतांमध्ये चर्चा घडतील, पण मला वाटते साहित्य क्षेत्राला आलेली मरगळ झटकण्यासाठी असे सोहळे घडून यायलाच हवेत.
सौ तनुजा मुळे (मानकर)
शिक्षिका