दिल्ली | Delhi
भारताची महत्वकांक्षी चंद्र मोहिम चांद्रयान-३ यशस्वी झाली, मात्र या मिशनमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या वैज्ञानिक एन. वलरमथी यांचं नुकतेच निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) वैज्ञानिक वलरमथी यांच्याच आवाजात आपण चांद्रयान प्रक्षेपणावेळी शेवटचे काउंटडाउन ऐकले होते. मात्र आता त्या काउंटडाऊनमागचा आवाज कायमचा हरवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञा एन वलारमथी यांना गेल्या काही दिवसांपासून ह्रदयविकारासाचा त्रास जाणवत होता. चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्या तामिळनाडूतील अरियालूर येथील घरी गेल्या होत्या. परंतु घरी असताना त्यांना अचानक ह्रदयात त्रास जाणवायला लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु हार्ट अटॅकच्या झटक्यामुळं त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह अनेकांनी एन वलारमथी यांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे. इस्त्रोचे माजी वैज्ञानिक पीव्ही व्यंकटकृष्ण यांनी देखील वलारमथी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
इस्रोच्या अनेक प्रकल्पांच्या उड्डाणांच्या काऊंटडाऊनला एन. वलरमथी यांचा आवाज लाभला होता. हाच आवाज आता अवकाशात विसावला आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान ३ चे १४ जुलै रोजी उड्डाण झालं. तर,२३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ चं लॅन्डर मोड्युल विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेला भारत हा देशातील चौथा देश ठरला आहे. तसंच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला भारत हा पहिला देश ठरला आहे.