Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधनदालची कमाल, वेस्ट इंडिज दौर्‍याची धमाल

नदालची कमाल, वेस्ट इंडिज दौर्‍याची धमाल

दक्षिण आफ्रिकेतल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया विंडीजविरुद्ध एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार असून रोहित शर्मा कर्णधार म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. तिकडे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत राफेल नदालने विक्रमी 21 व्या ग्रॅण्डस्लॅमला गवसणी घातली तर अ‍ॅश्ली बार्टी 44 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकणारी ऑस्ट्रेलियन ठरली.

भारतीय क्रिकेट संघ सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. कर्णधारपदाचा वाद आणि दक्षिण आफ्रिकेतल्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाला आता नवी सुरुवात करावी लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातली मालिका ही संघ उभारणीच्या दृष्टीने पर्वणी ठरू शकते. भारतीय संघ विंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय तसेच टी-20 मालिका खेळणार असून रोहित शर्मा क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारांमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारत आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यातल्या चुकांमधून धडा घेऊन विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.

दक्षिण आफ्रिका दौर्‍याआधी भारतीय क्रिकेट संघात बरीच उलथापालथ झाली. टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने क्रिकेटच्या या प्रकाराचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. एकदिवसीय आणि कसोटीत नेतृत्व करण्याची इच्छा असतानाही एकदिवसीय कर्णधारपदावरून त्याची गच्छंती करण्यात आली. दरम्यानच्या काळात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात बिनसल्याचे दिसून आले. रोहित शर्माने दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून अंग काढून घेतले. तिकडे दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपद के. एल. राहुलकडे देण्यात आले. मात्र कर्णधार म्हणून तो फारशी छाप पाडू शकला नाही आणि भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली. त्यातच विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. संघातल्या वरिष्ठ खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेसारख्या तुलनेने काहीशा दुबळ्या संघाविरोधात भारतीय संघाला इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारखा करिश्मा करता आला नाही. त्यामुळे भारतीय संघावर बरीच टीकाही झाली. अर्थात, फक्त एका दौर्‍यातल्या निराशाजनक कामगिरीवरून कोणतेही ठोकताळे बांधणे योग्य नसले तरी संघातला बेबनाव मात्र जगासमोर आला.

- Advertisement -

मात्र आता या सगळ्यातून बाहेर पडून आधीच्याच जोशात मैदानावर उतरण्याची वेळ आली आहे. शांत, संयमी आणि समजूतदार अशा प्रशिक्षक राहुल द्रविडलाही संघाला एकाच धाग्यात बांधून ठेवण्याच्या दृष्टीने पावले टाकावी लागणार आहेत. त्यासाठी वेस्ट इंडिजचा भारत दौरा ही सुसंधी ठरू शकते. करोनाच्या पार्श्वभूमीवर या दौर्‍यातले सर्व एकदिवसीय सामने अहमदाबादमध्ये तर टी-20 सामने कोलकातामध्ये खेळवले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या एकदिवसीय मालिकेतल्या पराभवानंतर रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाला बळ मिळाले आहे. भारताकडे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. रोहित परत आल्याने के. एल. राहुल मधल्या फळीत खेळू शकतो. यामुळे भारताची मधली फळी बळकट होऊ शकते. रोहित शर्मासह विराट कोहली, के. एल. राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत असे तगडे फलंदाज भारताकडे आहेत आणि मायभूमीत त्यांची बॅट तळपेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यंदा दीपक हुडालाही संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या साथीने वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर धावा वाढवू शकतात. या मालिकेत युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी पुन्हा दिसणार आहे. त्यांना रवी बिश्नोई या युवा खेळाडूची समर्थ साथ मिळू शकते. धोनीच्या कर्णधारपदाच्या काळात चमकलेला कुलदीप यादव वेस्ट इंडिज मालिकेतून पुनरागमन करत आहे. त्याच्यावर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या भारताच्या हुकुमी एक्क्यांना आराम देण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेत शार्दूल ठाकूरसह दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर जलदगती गोलंदाजीचा भार असेल. तिकडे टी-20 मध्ये ईशान किशन, अक्षर पटेल, भुवनेेश्वर कुमार आणि हर्षल पटेल हे चेहरे संघाला बळ देतील. रवी बिश्नोईला एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही संघांमध्ये स्थान मिळाले आहे.

तिकडे वेस्ट इंडिजने अलीकडेच मायदेशात इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका जिंकली. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. वेस्ट इंडिज संघाची कमान किरॉन पोलार्डच्या हाती असून होल्डर आणि पोलार्डसह डेरेन ब्राव्हो, अल्जारी जोसेफ, निकोलस पूरन हे खेळाडू कमाल करू शकतात. त्यांच्याकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला कमी लेखणे टीम इंडियाला महागात पडू शकते. यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक रंगणार आहे. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकही आहे. या स्पर्धांसाठी भारताला संघ उभारणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने पुढची प्रत्येक मालिका महत्त्वाची ठरणार आहे आणि त्याअनुषंगाने प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे मूल्यमापनही होणार आहे. म्हणूनच प्रत्येक खेळाडूला मैदानात शंभर टक्के योगदान द्यावे लागणार आहे.

टेनिस जगतातल्या रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दिग्गजांना जमले नाही ते परवा स्पेनच्या राफेल नदालने करून दाखवले. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून त्याने विश्वविक्रमी एकविसाव्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. 34 वर्षांच्या नदालने आपल्यापेक्षा दहा वर्षे लहान असणार्‍या रशियाच्या डेनियल मेदवेदेववर 3-2 अशी मात केली. महत्त्वाची बाब म्हणजे पहिले दोन सेट गमावल्यानंतर नदालने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आणि अत्यंत चुरशीचा हा सामना जिंकला. नदालला 21 वे ग्रॅण्डस्लॅम खुणावत होते. ही संधी सोडायची नाही, असा निर्धारच जणू त्याने केला होता. नशीबही धाडसी माणसास साथ देते असे म्हणतात. नदालच्या बाबतीत तसेच घडले. दोन सेट गमावल्यानंतरही नदाल डगमगला नाही. आपण पुनरागमन करू शकतो हे त्याला माहीत होते आणि त्याने ते केलेही. क्ले कोर्टच्या या एकेकाळच्या बादशहाने संपूर्ण टेनिस विश्व कधी कवेत घेतले हे कोणाला कळलेदेखील नाही. ठासून भरलेली गुणवत्ता आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या बळावर राफेल नदालने टेनिसमध्ये आपले साम्राज्य उभे केले. आज तो टेनिस जगताचा अनभिषिक्त सम्राट ठरला आहे. फेडरर आणि जोकोविच या दोघांनीही नदालवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नदालने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटाकावले होते. त्यानंतर 13 वर्षांनी त्याने ही स्पर्धा जिंकत इतिहास घडवला. या विक्रमावर नदालचा हक्क होता, असे त्याचे टीकाकारही सांगतात. यावरून त्याचे मोठेपण अधोरेखित होते. अनेक दुखापती आणि आव्हानांना सामोरे जात नदाल इथवर पोहोचला. नदालने रॉजर फेडररला त्याच्या उमेदीच्या काळात प्रत्येक कोर्टवर मात दिली आहे. जोकोविचसारखा तगडा आणि वयाने तरुण प्रतिस्पर्धी असतानाही त्याने हा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. आज नदालच्या पोतडीत ऑलिम्पिकचे सुवर्णपदकही आहे. येत्या काळात तो क्ले कोर्टवरही कमाल दाखवू शकतो आणि आपल्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांमध्ये भर घालून जोकोविचपुढे आव्हान उभे करू शकतो. अर्थात, वयाने लहान असणारा आणि यशासाठी आतूर असलेला जोकोविच नदालचा विक्रम मोडू शकतो. त्यामुळे सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांचा विक्रम नदालच्या नावे किती काळ राहणार हे पाहावे लागेल. मात्र या विक्रमाला गवसणी घालत सध्या तरी नदालने जोकोविचला मागे टाकले हे नक्की!

दरम्यान, जगातली पहिल्या क्रमांकाची महिला टेनिस खेळाडू अ‍ॅश्ली बार्टीने ऑस्ट्रेलियन टेनिस चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिने ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकत तब्बल 44 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. बार्टीने अमेरिकेच्या डेनियल कॉलिन्सवर सरळ दोन सेटमध्ये मात करून हे विजेतेपद खिशात घातले. बार्टीचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद ठरले. तिच्या रूपात ऑस्ट्रेलियाला 44 वर्षांनी महिला विजेती मिळाली. बार्टीची ही पहिलीच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा होती आणि पहिल्याच स्पर्धेत तिने कमाल करून दाखवली. 1980 नंतर ऑस्ट्रेलियन महिला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आणि विजेतेपदावर नाव कोरले. या कामगिरीनंतर बार्टीवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तिच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियातल्या महिला टेनिसला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमृता वाडीकर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या